Rahuri Crime News
राहुरी : इन्स्टाग्रामवर रिप्लाय दिल्याच्या कारणावरुन एका तरुणाला मारहाण करत असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चॉपरने वार करून करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरूआहेत. ही घटना राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात घडली. (Ahilyanagar News update)
प्रसाद बाळकृष्ण गिते रा. चिंचविहीरे याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय जाधव व अनिकेत गिते यांनी इस्टाग्रामवर स्वतःचे फोटो पोस्ट केले होते. त्या फोटोला अभि नालकर याने स्माईल इमोजी टाकली, असा संशय आरोपींना आला. या कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर 16 मे 2025 रोजी रात्री 9.30 वाजे दरम्यान प्रसाद गिते, तेजस साळवे, गणेश लोंढे व राहुल त्रिभुवन हे चिंचविहीरे शिवारातील जितेंद्र कुलकर्णी यांचे पडीत जमीनीवर चर्चा करत बसले होते.
त्यावेळी तेथे काहीजण आले. आशिष सांगळे म्हणाला की, आमचे भाऊला तु नडतो का? तसेच माझे पोरांचे इस्टाग्रामला इमोजी टाकतो का? असे म्हणुन त्यांनी दगड, लोखंडी गज व लाथाबूक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा प्रसाद गिते याचा मित्र गणेश लोंढे हा भांडण सोडवायला मधे आला असता त्यालाही मारहाण केली. आशिष सांगळे याने त्याच्यावर चॉपरने वार केला. आरडा ओरडा झाल्याने परिसरातील लोक जमा होऊ लागल्याने आरोपी तेथून पसार झाले. या घटनेत गणेश लोंढे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर प्रसाद बाळकृष्ण गिते याच्या फिर्यादीवरून आशिष अनिल सांगळे, रा. राहुरी फॅक्टरी, अक्षय कैलास जाधव, (रा. चिंचविहीरे), यश संजय भोसले, (रा. चिंचोली), अनिकेत राधाकिसन गिते, (रा. चिंचविहीरे), गोपाल गायकवाड, विकास मोकळ, हर्षल सोनवणे, श्रीकांत खंडागळे, गणेश तारडे, रॉनी तसेच इतर 5 ते 10 अनोळखी तरुण अशा सुमारे 25 ते 30 जणांवर मारहाण व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस पथकाने आशिष सांगळे व अक्षय कैलास जाधव यांना ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले. न्यायालयाकडून त्यांना 5 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.