

श्रीरामपूर : श्रीरामपूर बाजार समितीच्या 9 संचालकांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. संचालक मंडळ अल्पमतात आल्यामुळे बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी राजीनामा दिलेल्या विखे गटाच्या संचालकांनी केली. कारभार चांगला नसल्याचे कारण त्यामागे असल्याचे सांगण्यात येते. राजीनामा देणार्यांमध्ये विखे गटाचे 7, मुरकुटे व ससाणे गटाच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
बाजार समितीचे ससाणे गटाचे खंडेराव ढोकचौळे व मुरकुटे गटाचे किशोर बनसोडे यांनी विखे गटात प्रवेश केल्यामुळे या दोघांसह अभिषेक खंडागळे, नानासाहेब पवार, गिरीधर आसने, सरला बडाख, सुनील शिंदे, किशोर कालगंडे या संचाललकांनी राजीनामास्त्र बाहेर काढले. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या सल्ल्यानुसार संचालक पदाचे राजीनामे सहाय्यक निबंध यांच्या कार्यालयात दिल्याचे समजते.
बाजार समितीस देय असलेली बाजार फी, शासनाची सुपरव्हिजन फी, मापारी कर्मचार्यांचे मानधनामध्ये यापूर्वी कसूर केली होती. तसेच त्यांनी व्यापारी परवाना 1 एप्रिल 2024 नंतर नूतनीकरण केला नसल्याने त्यांचा परवाना खंडित झाला. या कारणावरून विखे गटाचे जितेंद्र गदिया यांना सहाय्यक निबंधक यांनी अपात्र ठरविले आहे. सध्याच्या सत्ताधारी गटाचे बाजार समितीत सध्या हम करेसो कारभार चालू असून शेतकर्यांवर अन्याय होत आहे. शेतकर्यांना न्याय मिळत नाही, तसेच बेकायदेशीर चालू असलेल्या कामामुळे आम्ही राजीनामे दिले असल्याची माहिती विखे गटाच्या या संचालकांनी दिली. त्यामुळे बाजार समितीवर आता प्रशासकाची नियुक्ती करावी, अशीही मागणी केली आहे. आता सहाय्यक निबंधक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संचालकांचे राजीनामे घेण्याचा व ते मंजूर करण्याचा अधिकार सभापतींना असतो, की सहाय्यक निबंधक यांना असतो यावर पुढील दिशा ठरणार आहे.
बाजार समितीमधील 18 पैकी 10 संचालक आता बाजूला पडले आहेत. आता बाजार समितीत ससाणे गटाकडे केवळ 8 संचालक उरले आहेत. त्यामुळे बाजार समितीत काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संचालकांना राजीनामे द्यायचे झाले तर ते नियमानुसार सभापती अथवा सचिवांकडे द्यावे लागतात. राजीनामे बैठक घेऊन ते मंजूर करण्याचे अधिकार सभापतींना असतात. कायद्यान्वये सहाय्यक निबंधक यांच्याकडे राजीनामे देणे चुकीचे आहे. दोन तृतीयांश सदस्यांनी राजीनामे दिलेले नाही, आजही 8 सदस्य संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे ज्या संचालकांनी राजीनामे दिले आहेत, त्या ठिकाणी निवडणूक घ्यायची की नाही हे अधिकार सभापती व सचिवांना आहेत. मात्र सहाय्यक निबंधक राजकीय दबावापोटी काहीही चुकीचे निर्णय घेत आहेत. मागील दोन वर्षांपासून चुकीचे निर्णय घेतले म्हणून न्यायालयाने त्यांना तंबी दिली. मात्र आता सहाय्यक निबंधक हे आमच्या हक्कावर गदा आणत आहेत. त्यामुळे त्यांची तक्रार मानवी हक्क आयोगाकडे करणार असल्याची भूमिका सभापती सुधीर नवले यांनी माध्यमांसमोर मांडली.फ
बाजार समितीच्या संचालकांना राजीनामे देण्यासाठी नगरला सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात घेऊन जाण्याची जबाबदारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले यांच्यावर दिली होती. विखे पाटील यांनी टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवत हे दोघे 9 संचालकांना घेवून नगरला आले, अन् तेथे राजीनामे दिले.