Liquor Pudhari
अहिल्यानगर

Chincholi Illegal Liquor Sale: चिंचोलीत अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; कारवाई न झाल्यास महिलांचे बेमुदत उपोषण

शाळेच्या परिसरात गावठी दारू विक्रीचा आरोप; शेकडो ग्रामस्थांचे राहुरी पोलिस ठाण्यात निवेदन

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: चिंचोली गावात अवैध दारू विरोधात पोलिस, महसूल प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. गावातील शाळेच्या परिसरातच अवैध गावठी व देशी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण बिघडण्याबरोबरच गावातील सामाजिक वातावरणही कलुषित होत असल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे.

अवैध दारूविरोधात चिंचोली ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव केला असून काल शुक्रवारी (दि. ४) शेकडो महिला व पुरुष ग्रामस्थांनी एकत्रित येत राहुरी पोलिस ठाणे गाठले. उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर व पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देऊन अवैध दारूविक्री तातडीने बंदची मागणी केली आहे.

अवैध दारू विक्रीला आळा न बसल्यास गावात टवाळखोरांचा वावर वाढत जाईल आणि सामाजिक शांतता धोक्यात येईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावातील भावी पिढी वाचवायची असेल, तर प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्षात अवैध दारूधंद्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.

ग्रामपंचायतीचा दारूबंदीचा ठराव आणि शेकडो ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनामुळे चिंचोलीतील अवैध दारूधंद्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर निवेदनावर सरपंच शोभा लाटे, उज्वला काळे, ज्योती सोनवणे, पुष्पा सोनवणे, ज्योती राऊत, सुवर्णा सोनवणे, कविता बर्डे, ज्योती निकम, मिरा गवळी, माया पवार, सुरेखा देशमाने, छाया भोसले, अनिल बर्डे, सुभाष बेलकर, राजेंद्र सोनवणे, आदित्य सोनवणे, बाजीराव सोनवणे, प्रकाश आरगडे, संतोष दांगट, रामनाथ राजभोज, संदिप काळे आदींच्या सह्या आहेत.

..तर महिलांचा लढा

अवैध दारूवर तातडीने कारवाई न झाल्यास चिंचोलीतील सर्व महिला बेमुदत उपोषणाला बसतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT