Solar Pump Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Solar Pump Scheme Fraud: चिचोंडी शिराळमध्ये सोलर पंप योजनेचा बट्ट्याबोळ; शेतकऱ्यांची वर्षभर फसवणूक

पैसे भरूनही सोलर पंप नाहीत; संबंधित कंपनीवर तातडीच्या कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

चिचोंडी शिराळ: राज्य सरकारच्या ‌‘मागेल त्याला सोलर पंप‌’ योजनेंतर्गत हक्काचे पाणी शेतात देण्यासाठी पैसे भरूनही, पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ भागातील शेतकरी गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षाच करत आहेत. या भागात सोलर पंप बसवण्याचे कंत्राट असलेल्या एका कंपनीने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत असून, कंपनीचे कर्मचारी आता शेतकऱ्यांचे फोनही उचलत नसल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

महावितरणकडून शेतीसाठी केवळ बारा तास वीजपुरवठा केला जातो.. तो देखील रात्रीच्या वेळी केला जातो. मात्र, शेतकऱ्यांना शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा व्हावा, म्हणून मुख्यमंत्री सौर शेतीपंप योजना हाती घेण्यात आली. मात्र, या योजनेचा चिचोंडी शिराळ परिसरात बट्टट्याबोळ उडाल्याचे दिसत आहे.

चिचोंडी शिराळ भागातील अनेक शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी सोलर पंपासाठी सरकारकडे रितसर पैसे भरले होते. मात्र, मुदत संपूनही त्या कंपनीकडून साहित्याचा पत्ता नाही. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिन्यात कंपनीच्या वेंडरने एका शेतकऱ्याला फोन करून विचारले की, आम्ही सोलर बसवण्यासाठी येत आहोत, तुमचे साहित्य कुठे ठेवले आहे? यावर शेतकऱ्याने संताप व्यक्त करत विचारले की, अद्याप साहित्य मिळालेच नाही, तर तुम्ही साहित्य कुठे आहे असे का विचारता? तेव्हा वेंडरने, आमच्या रेकॉर्डला तुम्हाला साहित्य पोहोच झाल्याचा मेसेज आला आहे, असे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. यावरून कंपनीच्या कामात किती मोठा सावळागोंधळ आहे, हे स्पष्ट होते.

या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर, कंपनीच्या प्रतिनिधींनी पंधरा दिवसांत साहित्य देऊन पंप बसवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी शेतकऱ्यांना खड्डे खोदण्यासही सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी विश्वासाने खड्डे खोदून ठेवले, मात्र या गोष्टीला आता महिना उलटून गेला तरी कंपनीचा पत्ता नाही. आता तर कंपनीचे कर्मचारी संबंधित शेतकऱ्यांचा फोनही उचलत नसल्याने, ही शुद्ध फसवणूक असल्याचे समोर येत आहे.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीवर सरकारने तत्काळ दंडात्मक कारवाई करावी. कामात दिरंगाई आणि खोटी माहिती देणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे. ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत, त्यांना तत्काळ सोलर पंप उपलब्ध करून देऊन बसवून द्यावेत, अशा मागण्या केल्या आहेत. आता या प्रकरणी कृषी विभाग आणि संबंधित शासन प्रशासन काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेतकऱ्यांनी पदरमोड करून योजनेसाठी पैसे भरले आहेत. वर्षभर वाट पाहूनही जर साहित्य मिळत नसेल आणि शक्ती कंपनीचे लोक उद्धटपणे उत्तरे देत असतील, तर ही शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
पीडित शेतकरी, चिचोंडी शिराळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT