नगर: छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्यावर आक्रमण करणारे त्या वेळचे दहशतवादीच होते. आजही देशावर हल्ला करणारे दहशतवादी औरंग्याच्या अवलादी आहेत. हिंदुत्वाची व स्वराज्याची कास धरून आपणही ही दहशतवादी जिहादी वळवळ बंद करण्यासाठी संघर्ष करू. छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्याचे कार्य पुढे नेऊ, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी सोमवारी केले.
प्रोफेसर कॉलनी चौकात महापालिकेने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे प्राथमिक अनावरण सोमवारी दुपारी आ. जगताप यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख आदिल शिंदे, माजी उपमहापौर गणेश भोसले, पुतळा कृती समितीचे अजिंक्य बोरकर, सतीश बारस्कर, मराठा महासंघाचे सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या स्वाती जाधव यांच्यासह माजी नगरसेवक तसेच मोठ्या संख्यने नागरिक व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी ढोल ताशांच्या गजरात छत्रपतींचा जयजयकार केला.
आ. जगताप म्हणाले, की शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अनावरण हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. हा सोहळा प्राथमिक अनावरण सोहळा आहे, मंगळवारी, 16 डिसेंबरला ठरल्याप्रमाणे सकल मराठा व सकल शिवप्रेमींच्या वतीने दिमाखदार सोहळ्याने या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. धर्मरक्षक संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला. आंदोलन केले राजू ससे यांनी उपोषण केले. 2007 मध्ये तत्कालीन नगरसेवक कैलास गिरवले यांनी महापालिकेत ठराव केला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनेही वेळोवेळी मागणी केली गेली. आता सर्वांची इच्छा व स्वप्न पूर्ण झाले आहे. पुतळा उभा राहिल्याने प्रत्येकाला आनंद झाला आहे.
नगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे उभारले. आता लवकरच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचे काम सुरू करू. पुतळे हे प्रेरणा देणारे व शहराची ओळख निर्माण करणारी स्मारके आहेत. या पुतळ्यांमुळे शहराच्या वैभवात भरच पडली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला त्या सर्वांचे आभार मानतो.
वेळोवेळी पालिकेच्या आयुक्तांनी व अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार मानतो, अशा शब्दांत आ. जगताप यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सुरेश इथापे यांनी स्वागत केले. अनिल मोहिते, गणेश कवडे, ज्योती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अजिंक्य बोरकर यांनी आभार मानले. उद्धव कालापहाड यांनी सूत्रसंचालन केले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.