संगमनेर: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात रविवारी (दि.14) पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने कुठली जीवित हानी झाली नाही. मात्र दरड कोसळण्याच्या घटनेमुळे घाट प्रवास धोकादायक झाल्याचे समोर आले आहे.
नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गाच्या कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते, तसेच अपघातही होतात. परतीचा पाऊस जोरात बरसत असल्याने चंदनापुरी घाटात डोंगरावरून पाणी वाहते आहेत. (Latest Ahilyanagar News)
दरड कोसळून अपघात होऊ नये यासाठी संरक्षक जाळ्या बसविलेल्या आहेत, मात्र ती जाळी तोडून मोठी दगडे थेट रस्त्यावर कोसळले. रविवारी सकाळी घडलेल्या दरड कोसळलेल्या घटनेने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. सुदैवाने घटनेत कुठलीच जीवीत हानी झाली नाही. मात्र वाहतूक विस्कळीत झाली. दरड कोसळल्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली.
प्रशासनाला आताशी आली जाग
पावसाळ्याचे दिवस संपून मॉन्सून आता परतीच्या मार्गावर आहे. परतीचा पाऊस कोसळत असल्याने दरडी कोसळत आहेत. प्रशासनाने आताशी दरडीकडेला जाळ्या बसविण्यास सुरूवात केली आहे. या जाळ्या तोडून दगड थेट रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे जीव मुठीत धरून वाहन चालकांना घाट पार करावा लागत आहे. घाटात दरड कोसळण्याच्या घटना नेहमीच घडतात, प्रशासन मात्र उशिराने जागे होत असल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
आ. सत्यजित तांबे दक्ष
नाशिक-पुणे महामार्गावरील घाटात दरड कोसळल्याची माहिती आ. सत्यजित तांबे यांनी हिवरगाव पावसा टोल नाक्यावरील प्रशासनाला दिली. आ. तांबे यांचा फोन आल्याने प्रशासनाने तातडीने तिकडे धाव घेत चंदनापुरी घाटातील दरड हटवली.