Chandanapuri Ghat Landslide Pudhari
अहिल्यानगर

Chandanapuri Ghat Landslide: चंदनापुरी घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत, मोठा अनर्थ टळला

पहिल्याच मुसळधार पावसात घटना; रस्त्यावरील दगड हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: दरवर्षी पावसाळ्यात चंदनापुरी घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. यंदाही पहिल्याच पावसात काल मंगळवारी (दि. ७) सकाळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. यात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. काल सायंकाळपर्यंत ही दरड हटवुन वाहतूक सुरू करण्यात आली.

गेल्या चार-पाच दिवसापासून तालुक्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यातच अनेक ठिकाणी नाशिक-पुणे महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसाळ्यात डोंगर व घाटात प्रवास करताना काळजी घ्यावी लागते. तर दरड कोसळण्याच्या घटनेने जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.

चंदनापुरी घाटात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. प्रशासन उपाययोजना करत नसल्याने वारंवार घटना घडत असून मंगळवारी (दि. ७) दुपारी घाटातच डोंगरावरील दगड रस्त्यावर पडले. ही दरड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने दगड रस्त्यावर पडत्यावेळी वाहने, नागरिक, प्रवासी या ठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच महामार्ग पोलिस निरीक्षक रावसाहेब बांबळे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले, त्यांनी छोटे दगड बाजुला केले. याची माहिती महामार्ग विभागाला देण्यात आली. त्यांनी महामार्गावर पडलेले दगड हटविले काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास झाला. पावसाळ्यात चंदनापुरी घाटातून जाताना काळजी घेण्याचे आवाहन महामार्ग विभागाने केले आहे.

दरम्यान, चंदनापुरी घाटातील डोंगरावरून काही छोटे-मोठे दगड रस्त्यावर पडले. याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन रस्त्यावरील काही दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे महामार्ग पोलिस निरीक्षक रावसाहेब बांबळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT