

नगर: स्टेशन रोड परिसरातील आनंदनगर येथे तीन वर्षाच्या चिमुरडीचा महावितरणच्या विजेच्या खांबाला शॉक लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या यधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी तब्बल पाच तास आंदोलन सुरू ठेवले. अखेर महावितरणकडून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत लेखी स्वरूपाचे पत्र देण्यात आले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, “आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आलो आहोत आणि पुढेही करत राहणार आहोत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणने शहरातील धोकादायक विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असते. मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. झाडांच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावरच टाकल्या जातात, त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. काही एजन्सींकडून वाकडे व निकृष्ट दर्जाचे वीज खांब उभारले जात असून त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. “अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच या निष्पाप चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे वेळेत लक्ष दिले असते तर आज ही घटना घडली नसती. अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
संपत बारस्कर म्हणाले, “या निष्पाप चिमुरडीचा मृत्यू हा महावितरणच्या कथित हलगर्जीपणाचा परिणाम आहे. संबंधित कुटुंबीयांनी वारंवार महावितरण कार्यालयाकडे तक्रारी करूनही कोणतीही उपाययोजना केली नाही. वेळेत दखल घेतली असती, तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती. या प्रकरणातील दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक महेश तवले, बाळासाहेब पवार, प्रकाश भागानगरे, मयूर बांगरे, दत्ता गाडळकर, अजिंक्य बोरकर, संभाजी पवार, सागर गुंजाळ, अभिजीत काळे, जॉय लोखंडे, दीपक खेडकर सुमित लोंढे, सुरज कोतकर आदी आदी उपस्रिी होेते.
महावितरणला दिले होते निवेदन
आनंदनगर परिसरातील नागरिकांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी महावितरण कार्यालयाकडे संबंधित विजेच्या खांबाबाबत लेखी तक्रार केली होती. या निवेदनामध्ये संबंधित इलेक्ट्रिक पोल अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तातडीने नवीन पोल बसविण्यात यावा, अन्यथा कधीही दुर्दैवी घटना घडू शकते, अशी स्पष्ट पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, या निवेदनाची दखल न घेतल्यामुळेच एका निष्पाप बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.