चांदा: चांदा ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या आठवड्यात पूर्ण होत असून, विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची ग्रामसभा खेळीमेळीत पार पडली. मात्र, या शेवटच्या ग्रामसभेलाही अनेक सदस्यांनी दांडी मारल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
गत आठवड्यात कोरमअभावी तहकूब झालेली ग्रामसभा शुक्रवारी (दि. 6) सकाळी साडेनऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाली. अध्यक्षस्थानी सरपंच रावसाहेब दहातोंडे होते. सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचन ग्रामविकास अधिकारी कदम यांनी केले. त्यानंतर ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चेला सुरुवात झाली. यावेळी अनेक ठराव संमत करण्यात आले.
त्यात पंधरा दिवसांपासून बंद असलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. तसेच बहुप्रतिक्षित जलजीवन मिशन अर्धवटच बंद पडल्याने यावरही ग्रामसभेत जोरदार चर्चा झाली. याबरोबरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारावा, घंटागाडी रोज फिरती राहावी, चांदा विद्यालयात क्रीडा शिक्षक नेमावा, गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अशा विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.
यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविकांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने बालविवाह मुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी शपथ घेण्यात आली. त्याचबरोबर चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने क्षयरोग मुक्त भारत करण्याची शपथ यावेळी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थांनी घेतली. यावेळी ग्रामसभेत एन. टी. शिंदे, प्रा. भाबड, सुभाष शेंडे,अशोक गाढवे, कार्तिक पासलकर, देवीदास पासलकर, शामराव पवार, किरण जावळे,श्री गाढवे यांनी मनोगत व्यक्त केले.
चांदा ग्रामपंचायतीने भालके वस्ती व लोहारवाडी परिसरातील नागरिकांसाठी बायपास रस्ता, तसेच चावडी सुशोभीकरण केल्याबद्दल ग्रामस्थांनी सरपंच व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सभेस उपसरपंच गोरक्षनाथ दिवटे, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब दहातोंडे, संतोष गाढवे, अरुण बाजारे, समद शेख, चांदा सोसायटीचे चेअरमन अरुण दहातोंडे, कामगार तलाठी बोरुडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती दळे, अंगणवाडीसेविका आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच रावसाहेब दहातोंडे यांनी आभार मांनले.