Cattle Fodder Camp Pudhari
अहिल्यानगर

Cattle Fodder Camp: दुष्काळात पशुधनासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; भोसे येथे लोकसहभागातून चारा छावणी सुरू

पहिल्याच दिवशी १५० ते २०० जनावरे दाखल; ५०० जनावरांची व्यवस्था करण्याचे नियोजन, दोन दात्यांकडून प्रत्येकी पाच टन उसाचे वाढे

पुढारी वृत्तसेवा

करंजी: दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांकडील पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या वर्षी पाऊसच न पडल्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध नाही. पिण्यासाठी पाणी नाही. अशा परिस्थितीत बळीराजा आणि त्याच्याकडील पशुधन मोठ्या संकटात सापडले आहे.

शेतकऱ्याचे पशुधन जगवण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील भोसे गावचे सरपंच बाळासाहेब टेमकर व प्रगतशील शेतकरी सुभाष शिंदे यांच्यासह त्यांच्या मित्र परिवारांनी एकत्र येत लोकसहभागातून दुष्काळी चारा छावणी सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी या चारा छावणीमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे पशुधन दाखल झाले असून सकाळपासूनच शेतकरी या छावणीत जनावरांसाठी शेड उभे करून जनावरे घेऊन येत होते. शासनाने ज्या पद्धतीने छावणीतील जनावरांना चारा-पाणी देण्याचे नियोजन आखले होते, त्याच पद्धतीने या चारा छावणीतदेखील चारा-पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील चार-आठ दिवसांत या चारा छावणीत किमान 500 जनावरे दाखल होतील, असा विश्वास सरपंच बाळासाहेब टेमकर यांनी व्यक्त केला.

दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा मोठ्या संकटात आहे त्याचे पशुधन जगले पाहिजे दुग्ध व्यवसाय मोडीत निघू नये कारण या परिसरात कुठेही पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना चारा नाही. टँकरने विकतचे पाणी आणून शेतकरी फळबागा जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी लोकसहभागातून ही चारा छावणी सुरू करण्यात आल्याचे सरपंच बाळासाहेब टेमकर, सुभाष शिंदे यांनी सांगितले. रविवारी सकाळी पंढरीनाथ महाराज टेमकर, परिवहन अधिकारी संजय फुंदे, छावणीसाठी जागा देणारे विनायक पावसे, संध्या पावसे, विजय पावसे यांच्या हस्ते छावणीतील शेतकऱ्यांना चारावाटप करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी तालुका दूध संघाचे अध्यक्ष सुरेश पवार, मुंबई येथील संत्रा मोसंबीचे व्यापारी जन्नतभाई मुंबईकर, माजी चेअरमन गंगानाना शिंदे, विठ्ठल टेमकर सर, बाळू टेमकर गुरुजी, उद्योजक अंबादास टेमकर, माजी सरपंच बाजीराव वारे, चेअरमन भाऊसाहेब टेमकर, रोहिदास शिंदे, देविदास टेमकर, प्रदीप टेमकर, भरत शिंदे, अशोक पाटोळे, संभाजी टेमकर, सुदाम टेमकर, सविता टेमकर, गणेश टेमकर, संदीप वारे, अशोक कराळे, देविदास शिंदे, बाळासाहेब टेमकर, संभाजी टेमकर, कानिफ टेमकर, बालू गायकवाड, आदेश टेमकर, सुदाम टेमकर, अक्षय टेमकर, जालिंदर टेमकर, बापूसाहेब शिंदे, श्रीकांत टेमकर, अशोक टेमकर,पांडू टेमकर, गणेश टेमकर, संदीप वारे यांच्यासह अनेक शेतकरी व प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी या चारा छावणीसाठी बाळासाहेब टेमकर मेजर व संत्रा मोसंबीचे व्यापारी जन्नतभाई मुंबईकर यांनी प्रत्येकी पाच टन उसाचे वाढे देऊन पशुधन जगवण्यासाठी एक चांगली सुरुवात करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT