अहिल्यानगर : नगरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातून अनेकदा वेगवेगळ्या त्रुटी काढून अडवणूक व आर्थिक लूट केली जात असल्याचा काहींचा खासगीतील अनुभव आहे. मात्र प्रशासकीय काम अडलेले असल्याने ‘दाखवता येईना आणि सांगताही येईना’ अशी अवघड अवस्था अर्जदारांची असते. त्यामुळे कोणी उघड उघड बोलत नाही. मात्र दोन दिवसांपूर्वीच जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी 18 हजारांची लाच घेताना खासगी महिलेला लाचलुचपतने ताब्यात घेतल्याने या कार्यालयातील ‘घोडेबाजार’ चव्हाट्यावर आला आहे. (Latest Ahilyanagar News)
जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी मागासवर्गीयांना अडचणी होऊ नये, याकरीता जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालये सुरू केलेली आहेत. या कार्यालयातून कमी वेळात आणि कमी खर्चात जात वैधता प्रमाणपत्र मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रस्तावांमध्ये पुरावे, कागदपत्रांच्या त्रुटी काढून मानसिक त्रास दिला जातो.
ऑनलाईन प्रक्रिया असतानाही कार्यालय परिसरातील सायबर कॅफे, खासगी इसमांची मदत घ्यावी लागते, त्यांना 10 हजारांपासून ते अगदी 50 हजारापर्यंत पैसे द्यावे लागतात, असेही कानावर येते. विशेष म्हणजे, अधिकारी, पैसे घेतल्याशिवाय सही करत नाहीत, असे निर्भीडपणे एजंट अर्जदारांना सांगतात, हेही नवल. असे असतानाही कालच्या प्रकरणात फक्त खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो, आणि ज्यांच्यासाठी लाच घेतली ते कर्मचारी, अधिकारी ‘मी तो नव्हेच’ हे दाखवत असल्याने त्यांना आरोपी केले जात नाही, हे आश्चर्य आहे.
मध्यंतरी मंत्री विखे पाटलांकडूनही नाराजी
राज्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील कामकाजाबाबत दस्तुरखुद्द मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती. तसेच प्रशासकीय कामकाज गतीमान करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली होती. कदाचित, नगरमधुनही तशा तक्रारी त्यांच्यापर्यंत्त पोहचल्या असाव्यात, असा अंदाज बांधला जात आहे.
अधिकारी मुळाशी जाणार का?
जातप्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात संशोधन अधिकारी अनिल तिदमे यांनी काही प्रमाणात शिस्त लावल्याचे सांगितले जाते, मात्र तरीही अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेले ‘ते’ कर्मचारी आणि खासगी एजंट यांची मिलिभगत असल्याचे लपून नाही. त्यामुळे विभागालाच बदनाम करणारी ही ‘सिस्टीम’ तिदमे कशी मोडून काढणार, याकडे लक्ष आहे. तत्पूर्वी, खासगी महिलेने ही लाच कोणासाठी घेतली होती, त्यात कोण कोण सहभागी होते, यासाठी तपासाकडे लक्ष असणार आहे.
प्रादेशिक उपायुक्त कुठं आहेत?
नगरचे उपायुक्त हे पद रिक्त आहे. नाशिकच्या राकेश पाटलांकडे नगरची अतिरीक्त जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये बसून ते नगरचा कारभार हाकत आहेत. कार्यालयात संशोधन अधिकारी हे पद भरलेले आहे. तर कनिष्ठ व वरिष्ठ असे दोनच लिपीक कार्यालयात आहेत. महत्वाचे म्हणजे, 19 कर्मचारी हे आऊटसोसिंगव्दारे घेतलेले आहे. काही कर्मचारी चांगले काम करतात, तर काही अधिकार्यांची मर्जी राखताना दिसत आहेत. सध्या उपायुक्त पदी कायमस्वरुपी अधिकारी नियुक्तीची गरज आहे.