श्रीरामपूर: पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागिदारची हत्या बेग बंधूंच्या सांगण्यावरूनच आणि राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रात अडचण निर्माण होत असल्याच्या रागातून करण्यात आल्याचा आरोप पोलिसात दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे.
रईस अब्दुलगणी शेख यांनी शहर पोलिस ठाण्यात ही फिर्याद दिलेी. दरम्यान, पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्यात कोपरगाव येथून कृष्णा अरुण शिनगारे आणि रवींद्र गौतम निकाळजे या दोघांना अटक केली आहे.
श्रीरामपूर येथील संतलुक हॉस्पिटलसमोर 31 डिसेंबरच्या दुपारी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागिरदारची हत्या केली. हत्या करणाऱ्या दोघांनी चन्या बेग, सोन्या बेग व टिप्या बेग यांच्या सांगण्यावरून बंटी जहागीरदार यास ठार मारले, असा आरोप रईस यांनी दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. बेग विधानसभेची निवडणूक थोड्या मतांनी पराभूत झाले होते, तसेच नगरपरिषदेच्या निवडणुकीतही केलेल्या कामाचा राग हे हत्येमागील कारण असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. बेग याने जाहीर प्रक्षोभक भाषणात जहागिदारला चिथावणीखोर धमक्या दिल्याचा उल्लेखही फिर्यादीत केला आहे.
दरम्यान, बंटी जहागिदारची हत्या होताच पोलिसांनी तपासासाठी तीन पथके नियुक्त केली. या पथकांनी ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपींचा माग शोधला. शिनगारे व निकाळजे हे दोघे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथे जाऊन शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोघांना बंटी जहागिदारच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
बंटीचा खून का केला?, खून करण्यासाठी वापरलेला कट्टा (गावठी पिस्तूल) कोठून आणले?, खुनाचा कट कसा व कोठे आखला? आणि गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे? या दृष्टीने अटकेतील दोघांकडे विचारपूस करण्यात येत आहे. दरम्यान, श्रीरामपुरातील तणाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरात एसआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.