गोरक्ष शेजूळ
नगर: शेतकरी आधुनिक शेतीकडे वळाल्याने पारंपरिक ‘सर्जा-राजा’च्या जोडीचा कुठेतरी विसर पडताना दिसत आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात कृषी व समाजकल्याण विभागाच्या फक्त योजनांमधूनच शेतकऱ्यांनी घेतलेल्या ट्रॅक्टरची संख्या ९ हजारांनी वाढली आहे, तर बैलांची संख्या मात्र ४० हजारांनी घटल्याचे पशुसंवर्धन विभागाचे आकडे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार, दि. १० सप्टेंबर) जिल्ह्यात बैलपोळा साजरा होत आहे, पण यंदा बैलांऐवजी गावातील मारुती मंदिराला ट्रॅक्टरची प्रदक्षिणा आणि घरोघरी ट्रॅक्टरलाच नैवेद्य दाखविण्यात येईल की काय, अशी परिस्थिती आहे.
पोळ्यासाठी शेतकरी उत्साहात असतात. पण गावच्या वेशीतून ज्या पाटलाचा बैल पहिला नेण्याचा मान होता, त्या पाटलाच्या दावणीला आज बैलच नसल्याचे विदारक चित्र बहुतांश ठिकाणी दिसत आहे. त्याची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. कृषी विभागाच्या योजनेतून २०२१ ते २०२६ पर्यंत ८१९९ ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आलेले आहे. तर समाजकल्याणच्या माध्यमातून आतापर्यंत ४६३ ट्रॅक्टर पात्र शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या पाच वर्षांत योजनांतून सुमारे ९ हजार ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या दारात उभे राहिले आहेत. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या दावणीचे बैलही कमी झाल्याचे वास्तव आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये खिलारी, जरशी, डांगीसह अन्य जातीचे एक लाख २२ हजार बैल होते. वेगवेगळ्या भागांत शेतकरी शेतीसाठी त्यांचा वापर करत होते. मात्र, २०२६ मधील आकडेवारीनुसार, ही संख्या ८२ हजारांवर आली आहे. त्यामुळे या पाच वर्षांत सुमारे ४० हजारांनी बैल कमी झाले आहेत.
पाच वर्षांत ...
बैलांची संख्या ४० हजारांनी घटली
शासन योजनेतून शेतकऱ्यांच्या दारात ९००० ट्रॅक्टर
थेट विक्रीतून अन्य शेतकऱ्यांकडे १००००+ ट्रॅक्टर
अनेक गावांत चक्क ट्रॅक्टरचा पोळा
बैलांची संख्या कमी झाल्याने अनेक गावांत आता ट्रॅक्टरचा पोळा मिरवला जात आहे. शेतकरी आपले ट्रॅक्टर सजवून गावच्या वेशीतून मारुती मंदिरासमोर आणताना दिसतात. त्यामुळे बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याचे अधोरेखित होत आहे.
पोळ्यावर दुष्काळाचे सावट
यंदा वरुणराजाने पाठ फिरवल्याने खरीप पिके संकटात आहेत. शेतीची मशागत, बी-बियाणे, खते, फवारणी असा मोठा खर्च करूनही पिके पाण्याअभावी ताणलेली आहेत. अनेक भागांत त्यांनी माना टाकल्या आहेत. शेतीचे गणित कोलमडले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, त्याचे पडसाद पोळ्यावर पाहायला मिळाले आहेत.