नगर: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूरसंचार कंपनीने बीएसएनएल मोबाईल नेटवर्कची क्षमता लक्षणीयरित्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २६ हजारांहून अधिक अतिरिक्त ‘फोर जी ’बीटीएस साईटस ऑर्डर दिली असून, त्यामुळे अधिक शहरे, गावे आणि दुर्गम भागांपर्यंत ‘फोर जी’ नेटवर्कचा विस्तार होणार आहे. विशेष उपक्रम म्हणून एक रुपयात फ्रीडम २.० ऑफर उपलब्ध केली. याशिवाय सॅटेलाईट फोनसह विशेष आठ सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे बीएसएनएलचे अहिल्यानगर व बीड जिल्ह्यांचे महाप्रबंधक रामराज यादव यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलच्या वतीने ग्राहकांसाठी नवीन आठ सेवा सुरु होत आहेत. त्याबाबत माहिती तसे उपक्रमाची माहिती देण्यासाठी अहिल्यानगरातील टेलिफोन भवनात शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी महाप्रबंधक यादव बोलत होते. यावेळी अहिल्यानगरचे सहाय्यक महाप्रबंधक विजय पिंपरकर आदी उपस्थित होते.
महाप्रबंधक यादव म्हणाले की, बीएसएनएलच्या ग्राहक केंद्रीत नव्या डिजिटल उपक्रमांची घोषणा भारत दूरसंचार विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी ‘फोर जी ’चा विस्तार आणि ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा केली जात आहे. ‘फोरजी’ नेटवर्कचे सर्वसमावेशक ऑप्टिमायझेशन करण्यात आले. त्यामुळे आता नेटवर्कची गुणवत्ता सुधारली आहे. त्यामुळे अधिक व्यापक आणि सातत्यपूर्ण कव्हरेज, अधिक वेगवान डेटा स्पीड, उत्तम कॉल कार्यक्षमता आणि एकूणच ग्राहकांच्या अनुभवात लक्षणीय सुधारणा झाली. हे नेटवर्क पूर्णपणे स्वदेशी आणि ‘फाईव्ह जी ’मध्ये अपग्रेड करता येण्याजोग्या तंत्रज्ञान स्टॅकवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.
महाप्रबंधक यादव पुढे म्हणाले की, एक रुपयात ‘फ्रिडम २.० ऑफर’ हा विशेष उपक्रम जाहीर केला आहे. या ऑफरमुळे नवीन ग्राहकांना केवळ एका रुपयात बीएसएनएलच्या मोबाईल नेटवर्कचा अनुभव घेता येणार आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा, १०० एसएमएस, अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध होणार आहे. यासाठी मात्र २४ दिवसांची वैधता असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय बीएसएनएलच्या वतीने १ हजार १११ रुपयांचा प्रति महिना फायबर फ्रिडम प्लॅन देखील उपलब्ध केला आहे. या प्लनमध्ये २०० एमबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड, दरमहा ५ हजार जीबी डेटा, २५हून अधिक प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रवेश आणि एकाच कनेक्शनव्दारे सर्वसामावेशक ब्रॉडबँड आणि डिजिटल मनोरंजनाचा अनुभव ग्राहकांना येणार आहे.
याशिवाय ग्राहकांसाठी नवीन सेल्फकेअर मोबाईल ॲप सेवा, टीव्ही टॅगो टीव्ही व्दारे संचलित फ्रि इंटरटेनमेट टीवी सेवेचा विनामूल्य आनंद ग्राहकांना घेता येणार आहे. वार्षिक २ हजार ३९९ प्रीपेड फ्लॅनवर अतिरिक्त ४७ दिवसांची वैधता मिळणार आहे. त्यामुळे या प्लॅनची वैधता आता ४१२ दिवस राहाणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
१.३४ लाखांत सॅटेलाईट हॅन्डसेट
उपग्रह कनेक्टिव्हिटीचा वापर करुन बीएसएनएलने आता ग्लोबल सॅटेलाईटफोन सेवा उपलब्ध केलीआहे. या सेवेमुळे पारंपारिक स्थलीय मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसलेल्या ठिकाणीही व्हॉइस कम्युनिकेशन सुविधा उपलब्ध होणार आहे. ही सेवा पूर्वी व्हीआयपींचे दौरे तसेच शासकीय कार्यालयांत वापरली जात होती. आता सर्वासाठी ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. हा मोबाईल हॅन्डसेट १ लाख ३४ हजार रुपयांना उपलब्ध असल्याचे दूरसंचार विभागाचे महाप्रबंधक रामराज यादव यांनी सांगितले.