

संगमनेर: अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या अमृतवाहिनी विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होत आहे. राज्य शासनाने विद्यापीठाला मान्यता दिल्यानंतर कॉस्मेटोलॉजी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, अभियांत्रिकी, व्यवस्थापन तसेच विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
थोरात म्हणाले, की उच्च शिक्षणाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासोबतच संशोधनाला चालना आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृतवाहिनी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
२ जुलै २०२६ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संबंधित विधेयकाला विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली.
राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अमृतवाहिनी विद्यापीठ कार्यरत झाले. या विद्यापीठामुळे संगमनेरसह उत्तर महाराष्ट्रातील उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची स्थापना १९७८ मध्ये सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी केली. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, कृषी तसेच शालेय शिक्षण अशा विविध क्षेत्रांत संस्थेने विस्तार केला असून, येथून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देश-विदेशातील विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत, असे संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू देशमुख यांनी सांगितले.
अमृतवाहिनी विद्यापीठाच्या माध्यमातून काळाशी सुसंगत आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी संगमनेरमध्ये उपलब्ध होतील, असा आम्हाला विश्वास आहे. गुणवत्तापूर्ण आणि भविष्याभिमुख शिक्षण देण्यासाठी अमृतवाहिनी विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल.
- सौ. शरयू देशमुख