मिरजगावमध्येही उपसरपंचपदी भाजपचे लहू वतारे विजयी; 'राष्ट्रवादी'च्या डॉ. गोरे दाम्पत्याची मते फुटली Pudhari
अहिल्यानगर

Karjat News: मिरजगावमध्येही उपसरपंचपदी भाजपचे लहू वतारे विजयी; 'राष्ट्रवादी'च्या डॉ. गोरे दाम्पत्याची मते फुटली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सागर पवळ यांचा दहा विरुद्ध सात मतांनी पराभव केला.

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: मिरजगावच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत आज (मंगळवारी) भारतीय जनता पक्षाचे लहू वतारे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सागर पवळ यांचा दहा विरुद्ध सात मतांनी पराभव केला. या वेळी डॉ. पंढरीनाथ गोरे व त्यांच्या पत्नी डॉ. शुभांगी गोरे या दोघांची मते फुटली.

त्यांनी भाजपचे वतारे यांना मते दिल्यामुळे पवळ यांचा पराभव झाला. त्यामुळे तालुक्यात आमदार रोहित पवार यांना विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्का दिल्याचे मानले जात आहे. (Latest Ahilyanagar News)

विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत डॉ. गोरे राम शिंदे यांना सोडून रोहित पवार यांच्यासोबत गेले होते. ते आता पुन्हा शिंदे गटात दाखल झाले आहेत. अवघ्या पाच महिन्यांवरच मिरजगाव ग्रामपंचायतीची निवडणूक आलेली असताना, डॉ. गोरे यांना कोणता शब्द शिंदे यांनी दिला, त्यामुळे त्यांनी रोहित पवार यांची साथ सोडली, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मिरजगावच्या उपसरपंच संगीता आबासाहेब वीर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी भाजपचे व शिंदे गटाचे लहू वतारे इच्छुक होते. मिरजगाव ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य असून, यामध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुनीता खेतमाळीस यांना अपक्ष तीन सदस्यांनी पाठिंबा देऊन विजयी केले होते. अपक्ष असलेल्या संगीता वीर यांना दोन वर्षांसाठी हे उपसरपंचपद देण्याची ठरले होते. मात्र त्यांनी लवकर राजीनामा दिला नाही.

विद्यमान सरपंच नितीन खेतमाळीस गटाकडून भाजपचे लहू वतारे यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता अर्ज दाखल केला. याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सागर पवळ यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झालेली दिसत होती. कारण खेतमाळीस यांच्याकडे वीर यांच्यासह आठ सदस्य होते. परंतु 1 सप्टेंबर रोजी आठ सदस्यांनी सभापती राम शिंदे यांची नगर येथे जाऊन भेट घेतली व या निवडणुकीबाबत चर्चा केली.

रात्रीत खेळ चाले

एक तारखेला रात्री अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या व सकाळी उपसरपंच पदाच्या निवडणुकीदरम्यान अचानक डॉ. पंढरीनाथ गोरे हे माजी सरपंच खेतमाळीस यांच्या गोटात दिसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले.

ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज दुपारी निवडणूक झाली. यामध्ये लहू वतारे यांना दहा तर सागर पवळ यांना सात मते मिळाली. रोहित पवार यांच्या सोबत असलेले डॉ. पंढरीनाथ गोरे व डॉक्टर शुभांगी गोरे या दोघांची मते फुटली. या दोघांनीही भाजपचे उमेदवार लहू वतारे यांना मतदान केले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी विकास हगारे यांनी पाहिले.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे सरपंच नितीन खेतमाळीस, परमवीर पांडुळे, डॉ. पंढरीनाथ गोरे या सर्वांच्या सहकार्यामुळे व माझ्यासोबत असलेल्या सर्व सदस्यांमुळे मला विजय मिळाला. नागरिकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीन.
-लहू वतारे, नवनिर्वाचित उपसरपंच, मिरजगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT