कोपरगाव : शहरातील मध्यवस्तीत असणार्या सचिन वॉच कंपनीचे दुकान फोडून चादर आडवी धरून दुकानातून 33 लाख रुपयांच्या घड्याळ व इतर साहित्याची चोरी करणारी कुप्रसिद्ध असलेली बिहारची सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. त्यात आठ जणांना अटक केली आहे असून त्यांच्याकडून 10 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
संजय लालचंद जैन, कोपरगाव, यांचे शहरामध्ये मध्यवस्तीत गुरुद्वारा रोडवर सचिन वॉच कंपनी घडयाळाचे दुकान आहे. दि.18 रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपन्यांची घडयाळे चोरून नेले. याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, पोलिस अंमलदार गणेश भिंगारदे, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमिजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे आदींचे पथक अॅक्टिव्ह मोडवर होते.
दरम्यान, दि.30 एप्रिल रोजी संबंधित पथक कोपरगाव शहरातील गुन्ह्यांचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास, रा.घोडासहन, बिहार व त्याचे इतर 7 साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जि.पुणे परिसरात असल्याची खबर लागली. पथकाने शिरूर येथे संशयीतांचा शोध घेऊन सुरेंदर जयमंगल दास, रियाज नईम अन्सारी, पप्पु बिंदा गोस्वामी, राजकुमार चंदन साह, राजुकुमार बिरा प्रसाद, नईम मुन्ना देवान, राहुलकुमार किशोरी प्रसाद, गुलशनकुमार ब्रम्हानंद प्रसाद, सर्व रा. घोडासहन, ता.घोडासहन, जि.मोतीहारी,राज्य बिहार यांना ताब्यात घेतले. पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी अंगझडती घेऊन त्यांचेकडून 9 लाख 81 हजार रुपये किंमतीचे त्यात टायटन, रागा टायटन, टायमॅक्स कंपनीची 100 घडयाळे, दोन वायफाय राऊटर, 7 मोबाईल असा एकुण 10 लाख 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आदींनी केली.
पथकाने ताब्यातील आरोपीकडे त्यांचेकडे मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता सुरेंदर जयमंगल दास याने ताब्यात मिळून आलेली सर्व घड्याळे ही तो व त्याचे साथीदारांनी मोबीन देवान रा. घोडासहन, ता. घोडासहन, जि. मोतीहारी, बिहार राज्य (फरार) याचेसह मागील 12 -13 दिवसांपुर्वी कोपरगाव शहरातील एका घड्याळाचे शोरूममधून चोरी केले असून ही चोरी करताना त्यांचेकडील मोबाईल व राऊटरचा वापर केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले का? याबाबत विचारपूस करता सुरेंदर जयमंगल दास याने त्याचे वरील साथीदारांनी मिळुन मागील 15 ते 16 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकलगेट परिसरात रात्रीचे वेळी मोबाईल शॉप फोडुन मोबाईल फोन चोरले आहेत. चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री केल्याची माहिती सांगीतली. याची संभाजीनगर पोलिसांत शहानिशा केली असता खात्री झाली.