Bhandardara Dam Pudhari
अहिल्यानगर

Bhandardara Nilwande Dam Water Release: भंडारदरा, निळवंडेतून आजपासून पाणी सोडणार; दुष्काळी भागांना दिलासा!

निळवंडेतून अडीच टीएमसी पाण्याचे आवर्तन; भंडारदऱ्यातून पिण्याच्या पाण्यासाठी १२०० क्युसेकने विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

नगर: संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रविवारीपासून (दि.१५) भंडारदरा धरणातून पिण्‍यासाठी तर निळवंडे धरणातून शेती आणि पिण्‍यासाठी आवर्तन सुरू करण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी दिले. या पाण्याचा अपव्यय टाळून अतिशय संवेदनशीलपणे या आवर्तनाचे नियोजन करण्याच्‍या सुचना त्यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्‍यान, पिण्‍यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्‍ध होणार असल्‍यामुळे या दोन्‍ही धरणांच्‍या लाभक्षेत्रातील जनतेला ऐन दुष्‍काळी परिस्‍थितीत दिलासा मिळाला आहे.

पावसाअभावी धरणांच्‍या लाभक्षेत्रात दुष्‍काळी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्‍थितीत गेल्‍या काही दिवसांपासून भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई विचारात घेऊन तातडीने आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी शनिवारी (दि.१३) लोणी येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.

या बैठकीत त्यांनी भंडारदरा आणि निळवंडे धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. सद्यस्थितीत पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता तत्काळ आवर्तनाचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. भंडारदरा धरणातून रविवारी (दि.१५) पिण्‍यासाठी (बिगरसिंचन) आवर्तन सोडण्यात येणार आहे. यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांसह श्रीरामपूर शहराला मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय इतर तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांनाही याचा लाभ होईल, असे नियोजन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.

निळवंडे धरणातूनही रविवारी (दि.१५) शेतीसाठी आणि पिण्‍यासाठी आवर्तन सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या पाण्याचा लाभ डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कार्यक्षेत्रातील पिकांना होणार असून, संबंधित गावांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाईही काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. दोन्ही धरणांतून सुटणाऱ्या या आवर्तनाचे नियोजन करताना पाण्याचा कोणताही अपव्यय होणार नाही, याची विशेष दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहेत.

‘निळवंडे’तून अडीच टीएमसीचे आवर्तन

निळवंडेतून रविवारी (दि.१५) सायंकाळी शेतीसाठी तसेच पिण्‍यासाठी आवर्तन सोडण्‍यात येणार असून, जवळपास अडीच टीएमसी पाण्‍याचा वापर होणार आहे. हे आवर्तन ३० ते ४० दिवस चालणार आहे. या आवर्तनाचा लाभ अकोले, संगमनेर, राहुरी, कोपरगाव व राहाता तालुक्‍यांसह किंचित श्रीरामपूर तालुक्‍यालाही होणार आहे. यापूर्वी निळवंडे धरणातून सप्‍टेंबर महिन्‍यात आवर्तन सोडण्‍यात आले होते, अशी माहिती उउर्‍ध्‍व प्रवरा धरणाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हासे यांनी दिली.

‘भंडारदरा’तून दुपारी १२ वाजता आवर्तन

भंडारदरा धरणात सध्‍या १० हजार दलघफू इतका पाणीसाठा असून, रविवारी (दि.१५) दुपारी १२ वाजता फक्‍त पिण्‍यासाठी १२०० क्‍यूसेकने आवर्तन सोडण्‍यात येणार आहे. अपेक्षेप्रमाणे त्‍यामध्‍ये वाढ होणार आहे. हे आवर्तन चार ते पाच दिवस सुरु असणार आहे. या आवर्तनातून धरणाच्‍या लाभक्षेत्रातील अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्‍यांतील पाणी योजनांना होणार असल्‍याचे अहिल्‍यानगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्‍वप्‍नील काळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT