अकोले: मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन-तीन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 5 हजार 542 दशलक्ष घनफुटांवर पोहचला आहे. म्हणजेच सुमारे 11 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भंडारदरा धरण निम्मे (50 टक्के) भरले आहे. सुमारे साड़ेआठ टीएमसी क्षमतेच्या निळवंडे धरणाचा साठाही 3588 दशलक्ष घनफुटांवर (43 टक्के) पोहचल्याने तेही लवकरत अर्धे भरणार आहे.
अकोले तालुक्यातील पावसाचे आगर समजल्या जाणार्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात अधूनमधून पाऊस आहे. त्यात भंडारदरा धरण पाणलोटात संततधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक सतत वाढत आहे. (Latest Ahilyanagar News)
परिसरातील निसर्गाने हिरवळीची शाल पांघरली आहे. डोगरमाथ्यावर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. भंडारदरा धरणात 12 तासांत 121 दशलक्ष घनफूट नवीन पाणी आल्याने गुरुवारी सायंकाळी 5542 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्याने भंडारदरा धरण 50 टक्के भरले. मुळा पाणलोट क्षेत्रातील पिंपळगाव खांड, अंबित धरणांबरोबरच देवहंडी लघुपाटबंधारे प्रकल्पही भरल्याने शेतकर्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.
भंडारदरा परिसरात 24 तासांतील पाऊस (गुरुवारी सायंकाळपर्यंत कंसात एकूण पाऊस)
भंडारदरा : 75 (659) मिलिमीटरमध्ये
घाटघर : 89 (1048) मिलिमीटरमध्ये
रतनवाडी : 101 (1070) मिलिमीटरमध्ये
पांजरे : 78 (676) मिलिमीटरमध्ये
वाकी : 49 (443) मिलिमीटरमध्ये
निळंवडे : 3 (319) मिलिमीटरमध्ये