Banana Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Banana Farmers Crisis: केळी उत्पादक शेतकरी संकटात; दोन रुपये किलो भावाने विक्री

युद्धाचा फटका; उत्पादन खर्चही निघेना, श्रीगोंद्यात शेतकरी हतबल

पुढारी वृत्तसेवा

अमोल बी. गव्हाणे

श्रीगोंदा: सध्या सुरू असलेल्या युद्धाचा फटका केळीउत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, दोन रुपये किलोप्रमाणे केळी विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकरी खर्च सव्वा लाख रुपये, तर उत्पन्न तीस हजार रुपये निघाल्याने केळीउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात गेल्या काही वर्षांत शेतकरी फळबागेकडे वळला आहे. विशेषतः द्राक्ष, डाळिंब, पेरू यावर विशेष भर दिला जातो. केळीला चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यात सर्वच भागात केळी लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील मार्च महिन्यात लागवड केलेली केळी आता विक्रीयोग्य झाली आहे. मागील महिन्यात सुरू झालेल्या आशियातील युद्धामुळे (विशेषतः इराण-इस्रायल/अमेरिका संघर्ष) भारताच्या शेतीवर थेट आणि अप्रत्यक्ष मोठा परिणाम झाला आहे. हा परिणाम मुख्यतः खर्च वाढ, भाव घट-वाढ आणि निर्यात अडथळे या स्वरूपात दिसून येत आहे.

इतर फळांच्या तुलनेत केळीला मागणी कमी असल्याने कवडीमोल भावात केळी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तांदळी दुमाला येथील केळी उत्पादक शेतकरी दादासाहेब गव्हाणे यांनी मागील वर्षी तीन एकर क्षेत्रात केळी लागवड केली होती. केळीचे एक रोप पंचवीस रुपयांना बसले होते. केळी पिकातून आर्थिक उत्पन्न चांगले मिळेल असे गृहित धरून दादासाहेब गव्हाणे यांनी वर्षभर खत, पाणी, फवारणी याचे योग्य व्यवस्थापन केले. एकरी सव्वा लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला. केळीचे पीकही चांगले आले आहे. आता केळी विक्रीयोग्य झाली आहे. व्यापाऱ्यांनी दोन रुपये किलोने केळी मागितली. प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. एकूण खर्चाच्या तीस टक्केही रक्कम परत मिळत नसेल, तर शेतकऱ्याने कशी शेती करायची हा खरा प्रश्न आहे. कांद्यापाठोपाठ आता केळी पिकाची मोठी दयनीय अवस्था होऊ लागल्याने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे.

एक छोटा टेम्पो केळीविक्रीतून सहा हजार रुपये

केळीचे पडलेले भाव लक्षात घेता केळी विक्री करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. एका छोट्या टेम्पोत तीन टन केळी जाते. दोन रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये मिळतात.

नफा तर सोडाच उत्पादनखर्चही हातात नाही

केळी उत्पादक शेतकरी दादासाहेब गव्हाणे म्हणाले की, केळीला दहा ते पंधरा रुपयांच्या आसपास बाजारभाव असतो. सध्या सुरू असलेल्या युद्धाचा फटका येथील शेतीला बसला आहे. दोन रुपये किलोने केळीची विक्री होणार असेल, नफा तर सोडाच; पण उत्पादन खर्चही परत येणार नाही.

एकूण साडेतीन एकर केळी आहे. या क्षेत्रासाठी चार लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला आहे. या साडेतीन एकर केळी विक्रीतून लाखभर रुपये होतात की नाही असा प्रश्न आहे. जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी हा लढणारा आहे. आता शेतकऱ्यांवर खराब वेळ असली, तरी उद्याचे दिवस त्याचेच आहे. या आशेवर आम्ही प्रयत्न सुरू ठेवत आहोत.
दादासाहेब गव्हाणे, केळी उत्पादक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT