संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सुसंस्कृत सहकारामुळे अनेकांचे जीवन फुलले. हे कार्य काहींना सहन होत नाही आणि देखवतही नाही. जे भाव देवू शकत नाही, ते काम न करता राजकारणाचा गैरवापर एजन्सीद्वारे खोटे रिल्स बनवून व्हाट्सॲपवर बनावट माहिती टाकून, खोटा प्रचार करून, धर्माचा वापर व बुद्धीभेद करून तरुणांमध्ये विष कालविण्यासाठी केला जात आहे, असा घणाघाती आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता केला. (Latest Ahilyanagar News)
, , , , , , ,
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर कांचनताई थोरात, उपाध्यक्ष पांडुरंग घुले, रणजीतसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, डॉ. जयश्री थोरात, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, लहानभाऊ गुंजाळ, मीरा शेटे, दीपाली वर्पे, संचालक संतोष हासे, इंद्रजीत खेमनर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर सेक्रेटरी किरण कानवडे उपस्थित होते.
माजी मंत्री थोरात म्हणाले की, थोरात कारखान्याची रात्रं-दिवस चाके फिरतात. परमेश्वराची कायम साथ आपल्याला आहे. आपला हेतू चांगले असल्यामुळे चांगलेच काम होते. मागील हंगामात 3, 200 रुपये भाव दिला. कामगार, सभासद, ऊस उत्पादक व व्यापाऱ्यांना दिवाळी चांगली गेली. जे चांगली आहे ते नेहमी करतो, परंतू नेमकं हेच काहींना सहन होत नाही.
यंदा 9 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त गाळप होणे अपेक्षित आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडला. यामुळे निळवंडेचे पाणी आल्याने ऊस लागवड चांगली आहे. पुढच्या वर्षी 15 लाख मेट्रिक टनपर्यंत गाळप होईल. जास्त गाळप झाल्यास बगॅस जास्त निघतो. को- जनरेशन चांगले होते. युनिट एक्सपर्ट होते. शेतकऱ्यांनी एकरी शंभर मेट्रिक टन ऊस उत्पादन होईल, असे काम करावे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रबाहेरूनसुद्धा वेळेवर ऊस येईल. यासाठी सुचीप्रमाणे काम करावे. ऊस गाळप करताना रिकव्हरी महत्त्वाची असते. ऊस लागवड सहाव्या महिन्यात झाल्यामुळे अनेकदा अडचण येयते, परंतू परिपक्व ऊस आणल्यास चांगले रिझल्ट येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, संगमनेरचा सहकार दिशादर्शक आहे. या सहकारामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. मोठी रोजगार निर्मिती झाली आहे. चांगल्या ऊस उत्पादनासह शेतकऱ्यांनी शेतात कंपोस्ट खत वापरावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, जुन्या पिढीने सायकलपासून आत्तापर्यंत सर्व अनुभवले आहे. नवीन पिढीला सर्व रेडिमेड मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र जपण्यासाठी सर्वांचा विचार घेऊन, पुढे जायचे आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर, उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी आभार मानले. यावेळी तुषार दिघे, सतीश वर्पे, संपतराव गोडगे, विनोद हसे ,अरुण वाकचौरे, रामदास धुळगंड, अंकुश ताजणे, गुलाबराव देशमुख ,विलास शिंदे, नवनाथ आरगडे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे ,दिलीप नागरे, विजय राहणे, लता गायकर, सुंदरबाई दुबे समूहातील पदाधिकारी, सभासद शेतकरी व ऊस उत्पादक उपस्थित होते.
एकरी 100 टन उत्पादन घ्यावे
‘मागील गळीत हंगामात 3, 200 रुपये उच्चांकी भाव दिला. बोनस व पगार वेळेत दिले. यामुळे संगमनेरची बाजारपेठ फुलली. दिवाळी आनंदात गेली. थोरात कारखान्यावर सभासदांसह बाहेरील ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास आहे. चांगले काम सुरु आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, एकरी 100 टन उत्पादन घ्यावे, अशी अपेक्षा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
थोरात कारखान्याने नेहमीच वेळेत पगार, बोनस, शेतकऱ्यांचे पेमेंट अदा केले. यामुळे बाहेरील शेतकऱ्यांचा कारखान्यावर मोठा विश्वास आहे. त्यांचेही वेळेत पेमेंट केले आहे. निळवंडे धरण व कालवे आम्ही पूर्ण केले. कालव्यांच्या वरील भागात पाणी देण्यासाठी नियोजन केले. आपला तो ‘शब्द’ होता. वरच्या भागातील नागरिकांनाही पाणी मिळाले पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. ते शक्य आहे. 1 जानेवारीपासून थोरात कारखाना कर्मचाऱ्यांना 10 टक्के पगारवाढसुद्धा देण्यात येणार आहे.माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संगमनेर.