

श्रीरामपूर : ‘टेम्पोमधून कत्तल खाण्यात गाय घेऊन चालला आहे,’ असे म्हणत काही स्वयंघोषित बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टेम्पो चालक तरुणास बेदम मारहाण केली. मारहाणीचे व्हिडिओ स्टेटस व इंस्टाग्रामवर ठेवल्यामुळे बदनामी झाली, या भावनेतून तालुक्यातील गळनिंब येथील अनिकेत सोमनाथ वडीतके (18) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. (Latest Ahilyanagar News)
अनिकेत वडीतके हा (दि.27) रोजी गुहा येथून टेम्पोमध्ये गाय घेऊन कोल्हारमार्गे निघाला होता. दुपारच्या दरम्यान कोल्हार येथील काही युवकांनी, ‘आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते आहोत,’ असे सांगत टेम्पो अडविला. ‘तू ही गाय कत्तलखान्यास घेऊन चालला आहे,’ असे म्हणत त्याला टेम्पोतून ओढून बेदम मारहाण केली. मारहाणीचे व्हिडिओ मित्रांना व्हाट्सअप कॉल करून दाखविला. यानंतर पोलिसांना 112 कॉल करून या गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी अनिकेत याला समज देऊन सोडले.
अनिकेत घरी आला असता, मारहाणीचा व्हिडिओ इंस्टाग्राम व व्हाट्सअपवर ठेवल्याचे त्याला समजले. बदनामी तो सहन करू शकला नाही. त्याने गळनिब येथील राहत्या घरात दुपारी 11 वाजता आत्महत्या केली. मोठा भाऊ चैतन्य घरी आला असता, त्याला अनिकेत घरात फासावर लटकलेला दिसला. तत्काळ खाली घेऊन लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यास मृत घोषित केले.
यानंतर नातेवाईक लोणी पोलिस स्टेशनमध्ये गेले. आत्महत्या करण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करा. त्यांना अटक करा, त्याशिवाय आम्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करू देणार नाही. मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर रात्री 1 वाजता लोणी पोलिसांनी 4 कार्यकर्ते व इतर 2 अशा एकूण 6 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाच्या आत्महत्येनंतर जिल्हा विश्व हिंदू परिषदेच्यावतीने पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार दिनेश किशोर राखेच्या याने, व्यक्तिगत वादातून संघटनेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सोशल मिडियावर केल्याचे समजले आहे. त्याला बजरंग दलाच्या पदातून निलंबित केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.