आता प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वयंचलित हवामान केंद्र; बिनचूक माहिती मिळण्यास होणार मदत Pudhari
अहिल्यानगर

Automated Weather Stations: आता प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वयंचलित हवामान केंद्र; बिनचूक माहिती मिळण्यास होणार मदत

जागेचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

नगर: केंद्र शासनाच्या विन्ड्स प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 1322 ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत. या केंद्रांमुळे गावागावांतील हवामानविषयक अचूक माहिती उपलब्ध होऊन शेतकर्‍यांना हवामान आधारित कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या हवामान केंद्रांसाठी आवश्यक त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तहसीलदारांना दिले आहेत.

जिल्ह्यात सध्या मंडलनिहाय हवामान केंद्र आहेत. एका मंडलात दहा ते बारा गावांचा समावेश आहे. त्यामुळे गावनिहाय पावसाची अचूकता कळत नाही. यामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारच्या विन्ड्स प्रकल्पातंर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्राथमिक माहितीनुसार 111 गावांत केंद्र आहेत.  (Latest Ahilyanagar News)

त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने तयारी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी नुकतीच याबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला आहे. प्राथमिक माहितीनुसार 111 ग्रामपंचायत गावात पूर्वीचे हवामान यंत्र कार्यान्वित आहेत. या केंद्रांची नव्याने तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हाभरात किती केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे का याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

हवामान केंद्र उभारणीसाठी राज्यस्तरावर विविध कंपन्यांकडून निविदा मागविल्या जाणार असून अंतिम कंपनीला हे काम दिले जाणार आहे. या हवामान केंद्राच्या निगराणीसाठी ग्रामपंचायत कर्मचार्‍याची नियुक्ती केली जाणार आहे. काही अडचण निर्माण झाल्यास संबंधित कंपनीच्या कर्मचार्‍यांना बोलावून ते दुरुस्त केले जाणार आहे.

तापमान, पर्जन्यमान कळण्यास होणार मदत

ग्रामपंचायतनिहाय हवामान केंद्र उभारले गेल्यास तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती उपलब्ध होणार आहे. कृषी हवामान क्षेत्रात संशोधनासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामान विषयक आवश्यक ती माहिती प्राप्त होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT