Ashok Kharat Case Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat Case: भोंदूबाबा प्रकरणात मोठा खुलासा; ‘शिवानिका’ला पाणी देण्याच्या आदेशाची चौकशी

विखे पाटलांचे आदेश; दारणा प्रकल्पातील पाणी आरक्षण रद्द, पोलिस तपासामुळे उघड झाले कारनामे

पुढारी वृत्तसेवा

लोणी : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोदूबाबा अशोक खरात याच्या शिवानिका संस्थानला दारणा प्रकल्पातून पाणी देण्याच्या आदेशाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. हे पाण्याचे आरक्षण तातडीने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे खरात किती उच्चपदस्थांच्या संपर्कात होता, हेसुद्धा आता उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

विखे पाटील म्हणाले, की शिर्डी पोलिस प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेमुळेच खरातचे कारनामे उघड झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेऊन आरोपीला लूकआऊट नोटीस काढल्यामुळे खरात कुठेही पळून जाऊ शकला नाही. या सर्व प्रक्रियेमध्ये अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक, शिर्डीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपअधीक्षकांसह त्यांच्या सर्व टीमने अतिशय संयमाने केलेल्या तपासामुळेच या सर्व घटना उघड होऊ शकल्या. शिर्डी पोलिसांनी तयार केलेल्या पुराव्यांवरच आता नाशिकचे पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांच्या कर्तृत्वावर मला शंका नाही; परंतु एवढ्या मोठ्या घटना घडत असताना नाशिकचे पोलिस प्रशासन काय करीत होते, असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला.

राजीनामा यापूर्वीच द्यायला हवा होता

धर्माच्या नावाखाली निरापराध महिलांचे शोषण करणाऱ्या नराधमास उशिरा का होईना अटक झाली. यासाठी नेमलेल्या विशेष चौकशी पथकातून अधिक माहिती समोर येईल. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचे स्वागत करून, यापूर्वीच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रियाही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.

खरातशी माझा संपर्कही नाही

समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या फोटोबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीमध्ये दर्शनासाठी आले होते. त्यानंतर ईशान्येश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. पालकमंत्री या नात्याने मला त्यांच्या दौऱ्यात बरोबर राहावे लागले. त्यांची पूजा होईपर्यंत मी स्वत: जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांसमवेत मंदिराबाहेर थांबून होतो. त्यामुळे खरातशी माझा कुठला संपर्कही नाही.

पीडित महिलांचे ब्रेनवॉशिंग

शिर्डी- राहात्यातील ‌‘ती‌’ची नकारघंटा

नगर : राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखी तक्रारदार समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शनिवारी (दि. 21) काही महिला अधिकाऱ्यांनी शिर्डी व राहाता परिसरातील पीडित महिलांची भेट घेत त्यांची आपबीती जाणून घेतली व त्यांना दिलासा दिला. दरम्यान, या प्रकरणासोबतच जमीन फसवणूक व्यवहारातही एक तक्रारदार पुढे आला असून, तो सोमवारी अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेनड्राईव्हचा तपास. शिर्डी पोलिसांकडे हा पेन ड्राईव्ह जवळपास महिनाभर होता. तपासादरम्यान कोणत्याही महिलेची ओळख उघड होणार नाही, याची पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली होती. मात्र, नंतर नाशिक पोलिसांकडे पेनड्राईव्ह दिल्यानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिर्डी पोलिसांनी ज्या पद्धतीने गोपनीयता राखली, ती नाशिकमध्ये पाळली गेली नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे नगर पोलिसांबद्दल वाढलेल्या विश्वासामुळे अधिक तक्रारदार पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शनिवारी या प्रकरणातील काही महिलांना महिला पोलिस अधिकाऱ्यांनी विश्वासात घेऊन भेट घेतली. शिर्डी व राहाता परिसरातील काही महिलांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचे समजते, तर काही महिला तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. याशिवाय, जमीन फसवणूक प्रकरणात शिर्डी परिसरातील एक तक्रारदार पोलिसांत जाण्याच्या तयारीत असून, सोमवारी तो पुराव्यासह संपूर्ण माहिती पोलिसांना देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर-शिर्डी पोलिसांची कामगिरी ‌‘पुढारी‌’मुळे आली समोर

भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केली असली, तरी या संपूर्ण प्रकरणाची गुन्हेगारी कुंडली उलगडण्याचे श्रेय अहिल्यानगर पोलिसांकडेच जाते, अशी ठोस माहिती दैनिक पुढारीने समोर आणली आहे.

या प्रकरणातील शिर्डी येथील फिर्याद, भोंदूबाबाचा ऑफिस बॉय, पेनड्राईव्हमधील महत्त्वाचे पुरावे, तसेच अशोक खरातला शिर्डी प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या बाबी, या सर्व गोष्टी सर्वप्रथम दैनिक पुढारीच्या माध्यमातून उजेडात आल्या.

याशिवाय, भोंदूबाबा ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारीत होता आणि त्याच्यावर पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती, ही धक्कादायक माहितीही ‌‘पुढारी‌’नेच उघड केली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ नाशिकपुरता मर्यादित नसून, त्यामागील धागेदोरे अहिल्यानगर पोलिसांनीच उलगडले, हे स्पष्ट झाले. या वृत्तामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी केलेल्या तपासाची दखल घेत राज्यभरातून त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत असल्याचेही दिसून आले. अहिल्यानगर पोलिसांच्या तपासाचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केले. त्यांनी नगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, शिर्डीचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि प्रभारी पोलिस निरीक्षक गलांडे यांच्या कार्याची प्रशंसा केली. मात्र, ज्या कार्यक्षेत्रात हा प्रकार सुरू होता, त्या नाशिक पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT