आम्हाला एकत्र आणण्याचे काम राजळेंना जमले; अशोक आहुजा यांची उपरोधिक टीका Pudhari
अहिल्यानगर

BJP Leaders Clash: आम्हाला एकत्र आणण्याचे काम राजळेंना जमले; अशोक आहुजा यांची उपरोधिक टीका

भाजपच्या निष्ठावंतांवर अन्याय

पुढारी वृत्तसेवा

बोधेगाव: आम्हाला एकत्र आणण्याचे काम इतके वर्षे कोणाला जमले नाही ते आमदारांनी केल्याने त्यांचा खूप आभारी असल्याची टीका माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा यांनी पत्रकार परिषदेत आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता लगावला. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये गटबाजी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक अहुजा व प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे हे दोन नेते एकत्र येत त्यांनी निष्ठावान भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद घेत आमदार राजळे यांच्यावर खरपूस टीका केली. (Latest Ahilyanagar News)

आहुजा म्हणाले, कोणतीही पात्रता नसताना आमदार राजळे यांनी आपल्या नातेवाईकाला शेवगावचा भाजपा तालुकाध्यक्षपदी बसविले. त्यांचे पक्षासाठी काय भरीव योगदान आहे, असा सवाल केला.

भाजपमध्ये निष्ठावंतांची मोठी फळी आहे, पक्षासाठी वेळप्रसंगी जेलची वारी व राजकीय गुन्हे अंगावर घेतलेले व रस्त्यावर उतरून पक्षवाढीसाठी लाठ्याकाठ्या खाल्लेले हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना डावलून आमदार राजळे यांनी आपल्या नातेवाईकाची तालुकाध्यक्षपदी वर्णी लावली आहे.

गेल्या 30-35 वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ, प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्त्यांची सातत्याने अवहेलना व गळचेपी होत आहे. त्यांना न्याय दिला जात नाही. मोठा असंतोष लोकप्रतिनिधींबद्दल आहे आमदारांच्या मागे पुढे फिरणारा हा एक गोतावळा तयार झाला आहे. तो म्हणेल तेच खरं अशा पद्धतीने सध्या पक्षाचा कारभार सुरू आहे. पक्षात निष्ठावंताची अवहेलना केली जात असल्याची जोरदार टीका अहुजा यांनी केली. इंग्रजांनी भारतावर अतिक्रमण केले. त्याच पद्धतीने भाजपवर इतर पक्षातील लोकांनी अतिक्रमण झाल्याची खंत आहुजा यांनी व्यक्त केली आहे.

शेवगांव नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरणार असल्याचे सांगून भाजपचा आमदार नसताना तीन-तीन जिल्हापरिषद गट पक्षाच्या ताब्यात होते. परंतु आमदार राजळे यांच्या कार्यकाळात एकही पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकला नाही, तसेच होऊ नये, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप आहुजा यांनी यावेळी केला.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रेमसुख जाजू, सालार शैख, बाळासाहेब कोळगे, गणपत कर्डिले, माजी नगरसेवक कमलेश गांधी, शब्बीर भाई शेख, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, अमोल सागडे, अजय भारस्कर, नितीन मालानी, मच्चू बर्वे, अमोल घोलप, दीपक आहुजा, नितीन फुंदे, बंडूशेठ मेहर, राजेंद्र मेहर, राजू तरटे, राजू धनवडे, महादेव साखरे, अ‍ॅड श्याम कणगरे उपस्थित होते.

पक्षाच्या नव्हे, अप्रवृत्तीविरोधात लढा

प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे-अशोक आहुजा दिलजमाई ही कुठल्याही पदांसाठी अथवा कोणाला विरोध म्हणून नाही, तर पक्षात बाहेरचे अतिक्रमण थोपविण्यासाठी अप्रवृत्तीच्या विरोधात हा लढा हाती घेतला आहे, असेही अशोक आहुजा यांनी स्पष्ट केले.

विकामकामांच्या निविदा नातेवाईकांना: मुंडे

2014 मध्ये माजी जि प सदस्या हर्षदा काकडे व अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांना पक्षाने दिलेली उमेदवारी रात्रीतून पळविली गेली, कान भरणार्‍या कार्यकर्त्यांमुळे माजी सभापती दिलीपराव लांडे व माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे यांच्यासह अनेक मातब्बर पदाधिकारी पक्षापासून दूर झाले आहेत आमदार राजळे यांनी पक्षाच्या पदांवर त्यांचे जवळचे नातेवाईक व राजळे घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या लोकांची वर्णी लावली. विकासकामांची निविदा नात्यागोत्यांत देऊन कामांचा बट्याबोळ केला जात आहे, असे अशोक आहुजा व अरुण मुंडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT