

Flex torn Sangamner
संगमनेर: श्रावण मास लागल्यामुळे राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाविकांना शुभेच्छा देण्याचे फलक लावले. मात्र संगमनेर तालुक्यात पालकमंत्री, आजी-माजी आमदारांचे फलक फाडल्याने राजकीय वातावरण दूषित झाले आहे. शिवाय या घटनांमुळे द्वेष वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे भीती व्यक्त केली जात आहे. फ्लेक्स पाडल्या बाबत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर, नाशिक, पुणे महामार्गावर खाडगांव फाट्याजवळ आमदार अमोल खताळ यांचा फलक फाडण्यात आला. तर अकोले नाका जाजू पेट्रोल पंपासमोरील पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांचा मुख्यमंत्री वाढदिवस शुभेच्छा असलेला फ्लेक्स फाडण्यात आला. (Latest Ahilyanagar News)
रविवारी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान फाटा येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लावलेला फ्लेक्सही अज्ञात व्यक्तीने फाडला. दरम्यान, संबंधित तीनही फ्लेक्स कोणी फाडले, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
श्रावण मास लागल्याने भाविकांना श्रावण मासाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, इतर पक्षांत चढाओढ लागली आहे. परिणामी शहरासह तालुक्यात आता फ्लेक्स स्पर्धा सुरू झाली आहे. संगमनेर शहरातील बसस्थानक परिसर तर फ्लेक्सचे मार्केटच झाला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनाधिकृतपणे गेल्या अनेक महिन्यापासून फ्लेक्स लावण्यात आले आहे.
नगरपालिका अथवा ग्रामपंचायत या अनाधिकृत फ्लेक्सवर कुठलीच कारवाई करत नाही. कारवाई केल्यास संबंधित राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते दबाव आणून फ्लेक्स काढण्यास मज्जाव करतात. यातच आता फ्लेक्स फाडण्याची स्पर्धा निर्माण झाल्याची चर्चा संगमनेरातील सुज्ज्ञ नागरिक करत आहे.
संगमनेर शहर पोलिस स्टेशनला शिवसेना व भाजपाचे फ्लेक्स फाडल्या बाबत विनोद सूर्यवंशी यांनी तर तालुका पोलिस स्टेशनला काँग्रेसचे बाळासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.