

Rahata water project Sujay Vikhe
एकरूखे: राहाता तालुक्यातील डोर्हाळे, कोर्हाळे, वाळकी, गोरक्षवाडी, मोरेवाडीचा प्रश्न सोडविण्याऐवजी काही लोकांनी केवळ बोगद्यात फोटो काढले, हेल्मेट घालून पाण्याखाली हात वर करून केवळ नाटक केलं.
मात्र शेवटी खर्या अर्थाने पाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच मिळाले, असे सांगताना कार्यकर्त्यांच्या आशावादाचा आणि संघर्षाचा हा विजय आहे. अशक्य वाटणारे काम आपण शक्य करून दाखवले, असे पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)
राहाता तालुक्यातील मोरवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली व संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास कैलास तांबे पाटील, मारुती पाटील, डॉ. सोमनाथ गोरे, शेटे, प्रकाश गोरे, संतोष गोरडे, मच्छू पाटील, निळवंडे प्रकल्पातील लाभार्थी शेतकरी, ग्रामस्थ, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले, राहाता तालुक्यातील डोर्हाळे, कोर्हाळे, वाळकी, गोरक्षवाडी, मोरेवाडी या गावांमध्ये पाणी येईल, असा विचारसुद्धा लोकांनी स्वप्नात केला नव्हता. आपले विरोधक आणि काही हितचिंतक देखील या गावांना पाणी मिळणार नाही, असे सांगत होते. मात्र सखोल अभ्यास करून लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचे कार्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण करता आले.
निळवंडे लाभक्षेत्रातील कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत दिलेले वचन आम्ही केवळ एका वर्षात पूर्णत्वाच्या दिशेने नेले आहे. पाण्याचा शब्द दिला होता, त्यातील 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण करून पाणी प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहोचवणार.
एक विशेष अनुभव सांगून डॉ. विखे म्हणाले, डोर्हाळे गावातील जलपूजनाच्या कार्यक्रमात दोन ज्येष्ठ नागरिक भेटले. त्यांनी विचारलं, तुम्ही आम्हाला ओळखता का?’ मी नाही म्हणालो. त्यांनी सांगितलं की, ‘गेल्या 18 वर्षांपासून आम्ही नेहमी तुमच्या विरोधात मतदान करत होतो.
पण आमच्या गावात पाणी येईल, हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. आता मरेपर्यंत तुमच्या सोबत राहू अस यावेळी त्यांनी सांगितलं आपल्या कामातून मतपरिवर्तन घडताना पाहिलं आहे. 40 वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणार्या शेतकर्यांचा हा विजय आहे, आणि आजचा दिवस त्यांना समर्पित आहे.
गणेश कारखान्याच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. काही लोकांना वाटलं की आता आम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करता येईल, तशी रणनीती आखली गेली, पण इथल्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा 70 हजार मतांनी विधानसभेला निवडून आलो. विरोधकांनी संपूर्ण ताकद लावूनही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर उभे राहिलो आणि विजय मिळवला. आज मी विरोधकांना सांगू इच्छितो विकासाच्या बाजूने रहा आणि तुम्हीही विकासाच्या सोबत या, असाही चिमटा काढला.