Army Recruitment Fraud Pudhari
अहिल्यानगर

Army Recruitment Fraud: सैन्यात भरतीचे आमिष दाखवून ३४ लाखांची फसवणूक; आरोपीला अटक

बनावट ई-मेल आणि जॉइनिंग लेटरचा वापर; पारनेर पोलिसांची सातारा जिल्ह्यात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पारनेर: भारतीय सैन्य दलात भरती करून देतो, असे खोटे आश्वासन देऊन बनावट ई-मेल आणि मेसेज पाठवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला पारनेर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. या आरोपीने तब्बल ३४ लाखांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. पारनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरती रमेश सोनवणे (वय ३६, धंदा शेती, रा. वडुले, ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मोहन महादेव काकडे (रा. विठ्ठल मंदिर शेजारी, रुई, ता. कोरेगाव, जि. सातारा) याने फिर्यादीचा मुलगा दीपराज रमेश सोनवणे (वय १७) व इतर साक्षीदारांना, आपली बेळगावातील (कर्नाटक) महार बटालियन येथील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची खोटी माहिती दिली. आर्मीमध्ये भरती करून देतो, भरती न झाल्यास पैसे परत देतो, असे आश्वासन दिले.

त्यानंतर त्याने स्वतःच्या टॅबमध्ये बनावट मेल आयडी तयार करून बेळगावमध्ये भरती झाल्याबाबत आणि ट्रेनिंगसाठी हजर राहण्याबाबतचे खोटे मेसेज आणि सही नसलेले बनावट जॉईनिंग लेटर तयार करून साक्षीदारांच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी व साक्षीदारांकडून एकूण ३४ लाख स्वतःच्या बँक खात्यात वेगवेगळ्या वेळी घेऊन आर्थिक फसवणूक केली.

सातारा जिल्ह्यात शोध घेऊन पारनेर पोलिसांनी मंगळवारी (दि. १३) आरोपीला अटक करून पोलिस कोठडी रिमांड घेतला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक फौजदार जी. एस. डहाळे, पोलिस कॉन्स्टेबल डी. जी. अकोलकर, डी. एम. कैतके, दक्षता मोबाईल सेलचे राहुल गुंड व अरुण सांगळे यांनी केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT