Anganwadi Poshan Aahar Quality Pudhari
अहिल्यानगर

Anganwadi Poshan Aahar: अंगणवाडीच्या पोषण आहारावर प्रश्नचिन्ह; वटाणा शिजेना, गुळाऐवजी साखर अन् तेलाच्या दर्जावरही सवाल

अंगणवाडी सेविकांच्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल; अधिकारी स्वतः पोषण आहाराची चव व गुणवत्ता तपासणार

पुढारी वृत्तसेवा

नगर: घरच्या कुकरमध्ये मटन चार शिट्ट्यांत शिजते..., मग अंगणवाडीतील वाटाणा पाच शिट्ट्या झाल्यानंतरही शिजत नसल्याची व्यथा मांडणाऱ्या जिल्ह्यातील काही अंगणवाडी सेविकांनी अक्षरशः डोक्याला हात लावला. एवढेच नव्हे तर ‘परंपरा’ नावाच्या गोडतेलापासून, अगदी गव्हाचा भरडा, गुळाऐवजी दिली जाणारी साखर, मसाले याविषयीही वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या आहाराची अन्न व औषध प्रशासनाकडूनच एकदा तपासणी होण्याची मागणी पुढे येत आहे.

जिल्ह्यात पाच हजारांहून अधिक अंगणवाड्या असून, तब्बल ५० हजारांपेक्षा अधिक चिमुकले पूर्वप्राथमिक शिक्षण घेत आहेत. मुलांना अंगणवाडीची गोडी लागावी, शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाकडून पोषण आहार दिला जातो. गरोदर मातांनाही विशेष आहाराचा लाभ दिला जातो. मात्र, पोषण देणारा हाच आहार वारंवार चर्चेत का येतोय? हा प्रश्न आता गंभीर बनला आहे.

गुळाऐवजी साखर; लापशी की शिरा?

वटाणा दगडासारखा कडक आहे. त्यामुळे तो शिजवण्यासाठी बराच वेळ व इंधनही खर्ची होत आहे. त्याचबरोबर गव्हाचा भरडा जर आहे तसाच दिला तर चिमुरड्यांना त्रास होण्याची भिती आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना तो पुन्हा भरडून घ्यावा लागत आहे. गुळाऐवजी साखर दिल्याने त्याची लापशी करावी की शिरा.. असा प्रश्नही पडला आहे. काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी पदरमोड करून गुळ आणला आहे. मसाल्याच्या दर्जाबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. मात्र तांदूळ चांगल्या दर्जाचा आल्याचे सांगितले जाते.

आता साहेबच ‘चव’ घेणार!

काही ग्रामस्थांच्या तक्रारींची महिला व बालकल्याण विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी थेट प्रयोग करूनच वस्तुस्थिती तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आपल्या कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांना वाटाणा व तेल; तर पुरुष कर्मचाऱ्यांना भरडा देण्यात आला आहे. हा वाटाणा किती वेळात शिजतो, घरच्या वापरातील तेल आणि ‘परंपरा’ नामक तेलातील फरकही जाणून घेत त्याची उद्या मला माहिती द्या, तसेच वटाणा आणि तेल वापरून ती भाजी उद्याला डब्याला घेऊन या. एका पुरुष कर्मचाऱ्यालाही गव्हाचा भरडा देऊन साखरेची लापशी घेऊन येण्याच्या सूचना केल्या आहेत. आज बुधवारी याबाबत माहिती घेऊन चव देखील तपासणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या उद्याच्या डब्यातून पोषण आहाराच्या गुणवत्तेचे ‘गुपित’ बाहेर येणार का, याची उत्सुकता आहे.

पॅकेट फोडताच उबट वास!

अंगणवाडी सेविकांच्या म्हणण्यानुसार, विविध पॅकिंग उघडल्यानंतर काही आहारातून अक्षरशः उग्र वास येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे लाभार्थी आहार घेऊन जाण्यासही टाळाटाळ करतात. परिणामी, काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांनाच लाभार्थ्यांच्या घरी जाऊन हा आहार देण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे.

वटाणा शिजायला वेळ लागतो, याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. गोडतेल हे वेगळ्या कंपनीचे असू शकते. भरड्याच्याही तक्रारी नाहीत. तरीही, कोणत्याही बालकाच्या आरोग्याला अपायकारक आहार आपण जाऊ देणार नाही. आपण स्वतः आहारातील घटकांचा दर्जा व चव तपासून याबाबत गंभीरपणे दखल घेऊ.
संजय कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT