अकोले : तालुक्याची कामधेनू असलेल्या अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघास सहकार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल ग्रीन वर्ल्ड को-प्राईड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. ग्रीनवर्ल्ड, लीड जि डब्लू फौंडेशन, कॉसमॉस को- ऑप.बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘सहकार मंथन’ या कार्यक्रमामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल, कॉसमॉस को ऑप बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभव पिचड, उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, संचालक आनंदराव वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर, शरद चौधरी, अप्पासाहेब आवारी, रामदास आंबरे, जगन देशमुख, अरुण गायकर, गंगाधर नाईकवाडी, सुभाष डोंगरे, बाबुराव बेनके, शिवाजी गायकर, अश्विनी धुमाळ, सुलोचना औटी, तज्ज्ञ संचालक दयानंद वैद्य, बाळासाहेब मुंढे, जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत यांनी स्वीकारला.
अमृतसागर दूध संघाने नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेले आहे. सामाजिक जाणिवेतून शेतकऱ्यांच्या संकटकाळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत. सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देऊन उत्कृष्ट कामगिरी केली. या उत्कृष्ट कामगिरीमध्ये सर्व दूध उत्पादक शेतकरी, डेअरी, सर्व संचालक,सदस्य, सभासद व अधिकारी, कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभल्याची भावना दूध संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केली.