करंजी: अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी आमदार अक्षय कर्डिले यांची नगर तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड झाली. यानिमित्ताने आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या राजकीय वाटचालीची आठवण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'बाप से बेटा सवाई' या म्हणीप्रमाणे वडिलांच्या राजकीय वारशाची धुरा पुढे नेत आमदार अक्षय कर्डिले यांनी सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेत बिनविरोध प्रवेश केला आहे.
एकाच वर्षात आमदारकीनंतर जिल्हा बँकेचे संचालक पद मिळवून आमदार अक्षय कर्डिले यांनी राजकीय क्षेत्रात मोठी बाजी मारली आहे. आमदार कर्डीले यांच्या निवडीने सहकार क्षेत्रात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.
जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदारसंघातून आमदार कर्डिले यांच्या विरोधात माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे पुतणे प्रताप पाटील शेळके व बाळासाहेब हराळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, अखेरच्या दिवशी शेळके व हराळ यांनी माघार घेतल्याने आमदार कर्डिले यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला.
बँकेच्या मागील निवडणुकीच्या वेळी अनेक उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी लोकनेते आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु त्यावेळी त्यांना मात्र निवडणुकीला सामोरे जावे लागले होते.त्या निवडणुकीत देखील आमदार स्व. कर्डिले यांनी एक हाती विजय मिळवला.
बँकेच्या निवडणुकीत वडिलांना निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले, तर मुलाची बिनविरोध निवड झाली, हा बदल कर्डिले कुटुंबाच्या राजकीय प्रवासातील लक्षवेधी योगायोग ठरला आहे. स्व. कर्डिले यांचा राजकीय वारसा पुढे नेतांना त्यांचे विचार आणि कार्य उराशी बाळगून आमदार कर्डिले यांनी सहकार क्षेत्रातही आपली वाटचाल सुरू केली आहे.
एकीकडे वडिलांचा संघर्षमय राजकीय प्रवास, तर दुसरीकडे मुलाची बिनविरोध निवड, या दोन्ही घटनांची तुलना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच 'बाप से बेटा सवाई' ही म्हण आमदार कर्डिले यांच्या बिनविरोध निवडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. या निवडीबद्दल आमदार कर्डिले यांनी सर्व मतदारांसह जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे,माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बांधला फेटा!
आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे आमदार अक्षय कर्डिले यांनी वर्षभर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाहीर सत्कार घेणे टाळत डोक्याला फेटाही बांधला नाही. स्व. कर्डिले यांच्या प्रथम स्मृतीदिनानंतर आमदार कर्डिले यांची जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी फेटा बांधण्यास होकार दिला.