अकोले: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आवास सर्वेक्षण करण्यात आले. नुकतेचं घरकुल नसलेल्या सर्व्हे मध्ये 13 हजार 436 कुटुंबांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गरजू कुटुंबांना घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करणार आहे.
अकोले तालुक्यात सन 2018 च्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण प्रतीक्षा यादीत समाविष्ट नसलेल्या परंतु सद्यःस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबांना तसेच बेघर आणि कच्च्या घरात राहणार्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळावा, या उद्देशाने हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. या सर्वेक्षणाचा कालावधी दि. 1 एप्रिलपासून दि.31 जुलै 2025 पर्यंत होता. ग्रामपंचायत अधिकार्यांमार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. लाभार्थ्यांनी सेल्फ सर्व्हे प्रक्रियेमध्येही सहभाग घेतला. (Latest Ahilyanagar News)
ज्यांची नावे 2018 मध्ये तयार झालेल्या प्रतीक्षा यादीत नव्हती, अशा पात्र कुटुंबांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. पूर्वी प्रतीक्षा यादीत समाविष्ट नसलेल्या, परंतु सध्या पात्र असलेल्या कुटुंबांची नोंद घेणे हा या मोहिमेचा उद्देश होता. केंद्र सरकार ग्रामीण विकास मंत्रालय आणि ग्रामीण गृहनिर्माण विभागाने अतिरिक्त पात्र ग्रामीण कुटुंबांची ओळख पटविण्यासाठी हे सर्वेक्षण केले.
योजनेच्या लाभार्थ्यांनी सेल्फ सर्व्हे व ग्रामपंचायत अधिकार्यांमार्फत आवास व सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार तालुक्यातील जास्तीत जास्त बेघर कुटुंबांची नोंद घेण्यात आली. याद्वारे गरजू बेघर गरिबांना घरकुल मिळेल व कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. या सर्वेक्षणामुळे तालुक्यातील गरजू कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
दरम्यान, अकोले तालुक्यामध्ये मे, जुन, जुलै अखेर ग्रामसेवक व घरकुल लाभार्थ्यांनी स्व: ता मोबाईल मधुन घरकुलाचा सर्व्ह केला आहे .दरम्यान लाभार्थ्यांनी 7 हजार 265 घरकुल लाभार्थ्यांचा सर्व्हे केला. तसेच ग्रामसेवकांनी स्वतः मोबाईल मधून 6 हजार 171 घरकुल लाभार्थ्यांचा सर्व्हे केला असुन एकुण 13 हजार 436 लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल नसल्याची बाबं समोर आली आहे.