Akole FDA Action pudhari
अहिल्यानगर

Akole FDA Action: अकोल्यात 'एफडीए' ची एन्ट्री; चार टपऱ्यांवर धाडी, पाच जण ताब्यात

‘दैनिक पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने अकोले शहरातील चार पानटपऱ्यांवर धाडी टाकल्या. गुटखा विक्रीप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

अकोले: राज्यात गुटखा बंदी असताना राजूर, अकोले, कोतुळ परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. या अनुषंगाने ‘अकोल्यात गुटखा बंदीची ऐशी - तैशी ; कोतुळ, राजूर,भंडारदरा येथे खुलेआम विक्री, पर राज्यातुन येतोय गुटखा, पोलिसांचा 'अर्थ पुर्ण' आशीर्वाद" अशा आशयाचे वृत्त ‘दैनिक पुढारीत’ प्रसिद्ध होताच थेट 'एफडीएची' ने येथे एन्ट्री करुन, तब्बल चार टपऱ्यांवर धाडी टाकल्या.

गुटखा विक्रेत्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला. त्याला १४ वर्षे पूर्ण होत आहेत, मात्र ना कडक अंमलबजावणी झाली, ना गुटखा विक्री थांबली. भंडारदरा, अकोले, कोतुळ, राजूर शहर किंवा ग्रामीणमधील पानटपरी, दुकानांमध्ये गुटख्याची सर्रास विक्री होत आहे.

गुटखा विक्री होत असतानाही कारवाई होताना दिसत नाही. अकोले, राजूरच्या सरहद्दीवर पोलिसांचे तपासणी नाके नसल्यामुळे गुटखा येतोच कसा, या प्रश्नाचे ठाम उत्तर अधिकारी देऊ शकत नाहीत.

अकोले, राजूर व कोतुळ गुटख्याचे मुख्य होलसेल केंद्र बनले आहे. संपूर्ण तालुक्यातील गावातील टपऱ्या व दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा पुरविला जातो. तसेच अकोले, कोतुळ शहरामध्ये इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीला येतो.

गुटखा बंदीनंतर अनेकांनी मावा विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच गुटख्याची विक्री सुरुवातीला चोरून केली जात होती. आता सर्रासपणे विक्री केली जात आहे, मात्र शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे कायद्याचे पालन होत नाही.

शहरचं नव्हे, तर ग्रामीण परिसरात गुटखा विक्री सर्रास पानटपरी, दुकानांमध्ये होते. गुटखा विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे. ही साखळी तोडल्यानंतरच गुटखा विक्री कमी होण्यास मदत होणार आहे. अकोले तालुक्यात गुटखा कारवाईची धडक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘अकोल्यात गुटखा बंदीची ऐशी - तैशी ; कोतुळ, राजूर,भंडारदरा येथे खुलेआम विक्री, परराज्यातून येतोय गुटखा, पोलिसांचा 'अर्थ पुर्ण' आशीर्वाद" या ‘दैनिक पुढारी’तील वृत्ताची दखल घेत, अहिल्यानगर अन्न व औषधे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सोपान इगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी, प्रदिप पवार, पो. काँ.राहुल घोलप,अन्न व ओषध नमुना सहाय्यक प्रसाद कसवेकर यांनी अकोले शहरातील चार पान टपऱ्यावर छापे टाकले.

गुटखा पकडून गुटखा विकणाऱे अबुजर इब्राहीम बागवान (वय ५५ वर्षे, रा. बसस्थानकासमोर, सलमान इलियास तांबोळी, रोहिदास एकनाथ आंबरे (वय ६०, अभिजीत उमेश नाईकवाडी (वय २४ वर्षे व नंदकुमार माधव गायकवाड (वय ५०, सर्व रा. अकोले) यांच्या विरोधात गुन्हा केला आहे. या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

‘एफडीए’ची एण्ट्री अन् अक़़ोल्यात 'सन्नाटा'

अकोले शहरात गुरुवारी दुपारी ४ वाजता बाजार पेठीतील काही टपऱ्या व किराणा दुकान, हॉटेल अचानक बंद झाली. अचानक काय झाले, याबाबत चौकशी केली असता पानटपऱ्या व किराणा दुकानात अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तपासणीसाठी गावात आल्याचे पाहून इतर किराणा व्यावसाविक तसेच हॉटेल व्यावसाविकांनी व्यवसाय तत्काळ बंद केले. यामुळे बाजारपेठेत काही ठिकाणी अघोषित संचारबंदी जारी झाल्यासारखे दृश्य दिसले.

अधिकारी शहरात तळ ठोकून

चार पान टपऱ्यांची तपासणी सुरू असताना इतर दुकानदारांनी दुकाने का बंद केली, याची मोठी चर्चा शहरभर रंगली. दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अधिकारी शहरात तळ ठोकून होते. त्याकाळात काही हॉटेल, पान टपऱ्या, किराणा दुकानदारांनी व्यवसाय बंद ठेवले होते.

गुटखा विक्रीला पोलिसांचेच अभय?

अकोले शहरात अन्न व औषध प्रशासने अहिल्यानगर येथून येऊन अकोले शहरात चार ठिकाणी गुटखा विक्रेत्यांविरुद्ध थेट कारवाई केली. बाहेरच्या पथकांनी अल्पावधीत केलेल्या या कारवाईमुळे अकोले तालुका पोलिसांचे पितळ उघडे पाडले आहे. अकोले हद्दीत सर्रास सुरू असलेला अवैध लॉजवरील अवैध धंदे स्थानिक गुन्हे शाखा पथकानेच उघडकीस आणून थेट कारवाई केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT