Government Offices Pudhari
अहिल्यानगर

Akole Government Offices: अकोले तालुक्यात शासकीय कार्यालयांना ‘अपडाऊन’चे ग्रहण

मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे ग्रामीण नागरिकांच्या सेवांचा खोळंबा

पुढारी वृत्तसेवा

अकोले: तालुक्यात ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या शासकीय कार्यालयांना ‌‘अपडाऊन‌’चे ग्रहण लागले आहे. कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाही. उशिरा येणे व लवकर कार्यालयातून काढता पाय घेणे, असा प्रकार सुरू आहे. यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या अनेक सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

शासकीय व निमशासकीय कामासाठी लागणारे दस्तावेज मिळावेत, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मात्र, आदिवासी तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या अकोले तालुक्यातील शासकीय कार्यालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने नागरिकांची शासकीय, विविध योजना आणि काही कागदपत्रांसाठी गैरसोय होत आहे. याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना काहीच देणे-घेणे नाही. अकोले व राजूर शहरातील प्रशासकीय कार्यालयातून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरळीत कारभार करणे अपेक्षित आहे. घर भाडे भत्ता सुद्धा दिला जातो. त्यांना मुख्यालय राहणे बंधनकारक आहे. मुख्यालयी राहिल्यास नागरिकांचे कामे वेळेवर होऊन काही समस्या असल्यास त्याबद्दल तालुका प्रशासनाला अवगत करता येते.

अकोले पंचायत समितीअंतर्गत ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य-कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, महसूल विभाग, वन विभाग, कृषी विभागाचे कर्मचारी, महावितरणचे अभियंता व कर्मचारी अनेक ठिकाणी मुख्यालय नसल्याचे दिसून येते.

वास्तविक शासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहायचे आदेश देऊन वर्ष लोटले. मात्र, त्यांची अंमलबजावणी झाली नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष देण्याची गरज आहे. जे कर्मचारी घर भाडे घेतात, परंतु अकोले तालुका लगतच्या सिन्नर, इगतपुरी, जुन्नर, कोपरगाव, राहता, संगमनेर, राहुरी तालुक्यातून काहींच्या चारचाकीने तर काहींचा एसटीने प्रवास करतात.

मुख्यालयाबाबत माहिती घेतो: माने

अकोले पंचायत समितीत ग्रामपंचायत विभागात नवीन क्लार्क आहे. ग्रामसेवक मुख्यालयी राहतात की नाही, याबाबतची क्लार्क कचरेंकडुन माहिती माहिती घेतो, त्यानंतर तुम्हाला देतो, असे उत्तर गटविकास अधिकारी अमर माने यांच्याकडून मिळाले.

प्रशासकीय सेवेचा उडाला बट्याबोळ

बाहेरच्या अनेक कर्मचारी ठिकाणाहून ये-जा करत असल्याने नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. विशेषतः आरोग्य केंद्रातील, राजूर ग्रामीण रुग्णालय, राजूर व अकोले वीज महावितरण विभागातील अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे अकोले, राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे, तहसील कार्यालयाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक कर्मचारी व अधिकारी बहुतांश कर्मचारी कर्तव्यावर मुख्यालयी राहत नाहीत. कर्मचाऱ्यांना फोन लावला, तर फोन उचलत नाहीत. फोन उचलला, तर मी आज येणार नाही. मी तालुक्याला किंवा अहिल्यानगरला मिटिंगला आलोय, असे सांगतात. असा अनुभव येताना दिसतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT