Akole Brick Kiln Workers Pudhari
अहिल्यानगर

Akole Brick Kiln Workers: अकोलेतील वीटभट्टी कामगारांचे हालअपेष्टा; स्थलांतर, कमी मजुरी आणि जगण्याची झुंज

दिवसभर कष्ट करूनही अपुरा मोबदला; मजुरांसमोर आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षेचे प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जाधव

अकोले: स्वतःच्या आयुष्याच्या मातीचा गाळ तुडवून दुसऱ्यांची पक्की घरे उभारण्यासाठी संपूर्ण आयुष्यच मोलमजुरी करणाऱ्या कामगारांची हयात वीटभट्टीवर निघून जाते. पहाटे कामावर यायचे, दिवसभर पायानेच चिखल तुडवायचा, दिवसभर उन्ह, वाऱ्याचे चटके सोसत विटा थापणे आणि सायंकाळी हातावर पैसा पडल्यावर बाजारहाट करणे, असा दिनक्रम. जणू माती तुडवणे हेच वीटभट्टी कामगारांचे जीवन बनल्याचे चित्र अकोले तालुक्यात ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.

अकोले तालुक्यात वीटभट्ट्यांसाठी वातावरण पोषक आहे. तसेच अकोले, कोतूळ, राजूर, समशेरपूर, कळस, भंडारदरा, आंबेवगन, देवठाण, गणोरे, चितळवेडे, आदी परिसरात वीटभट्टी उद्योग मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. मात्र, या उद्योगावर काम करण्यासाठी लागणारे मजूर हे सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. परिणामी रोजगार मिळवण्यासाठी तसेच परिवारातील सदस्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चार ते पाच महिने असे अनेक जिल्ह्यातील तसेच बाहेरच्या राज्यातील मजूरवर्ग आपल्या संपूर्ण कुटुंबासह स्थानांतरित होत असतात. वीटभट्टी हा व्यवसाय बांधकाम क्षेत्रातील असंघटित क्षेत्रामध्ये मोडणारा व्यवसाय असून, हंगामी स्वरूपाचा आहे.

हंगामी कालावधीतच मजुरांना रोजगार मिळतो. अनेक कुटुंब विटा तयार करण्यासाठी मातीचा गाळ तुडवून कच्च्या विटा थापतात. विटांची भट्टी लावून पक्क्या विटा तयार करतात. यासाठी वीटभट्टी कामगारांना एक हजार विटांमागे 700 ते 800 रुपये मजुरी दिली जाते. तर एक हजार विटा तयार करण्यासाठी वीटभट्टी मजुरांला दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो.

तसेच साठ ते सत्तर हजार विटांची एक भट्टीत पेटविली जात असते. विट भट्टीतील विटा पूर्ण क्षमतेने भाजल्यावर विक्री केली जाते. वीटभट्टीच्या मजरीतून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याचा वीटभट्टी कामगारांचा खटाटोप होत असतो. यातून मिळालेली मजुरी खूप महत्वाची असते. तसेच स्थलांतरित वीटभट्टी कामगारांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, व्यसनाधिनता आदी गंभीर प्रश्न आहे.

विट भट्टीचा व्यवसायासाठी मजूर भेटत नाही. आळेकरांना मजुरी पोटी पैशाची उजल दिली जाते,परंतु आळेकरी उजल घेऊन विट भट्टीवर कामाला येत नाही. विट भट्टी मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असते .दुरवरुन माती आणावी लागते, त्यातचं अवकाळी पावसामुळे विटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन विट भट्टी मालकांना विट व्यवसाय करताना तारेवरची कसरत करावी लागते.
सुरेश भालेराव,विटभट्टी मालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT