राजेंद्र जाधव
अकोले: खिडक्यांना जाळ्या नाहीत, खाटा नसल्याने विद्यार्थी आजही चटईवर झोपतात. पिण्याच्या शुद्ध पाण्याचा तर पत्ताच नाही. महिला अधीक्षकही नाही. ही अवस्था आहे बाह्मणवाडा येथील आश्रमशाळेची. या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची व्यवस्था आणि सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अकोले तालुक्यात बाह्मणवाडा गावात १९९२ पासून इतर मागास बहुजन कल्याण विभागाची आश्रमशाळा आहे. तेथे पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. १२० विद्यार्थ्यांची शाळेला मान्यता असल्याने नगरच्या वरिष्ठ कार्यालयातून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र येथे १४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली ते आठवीच्या वर्गाला फक्त पाच शिक्षक असून एक मुख्याध्यापक आहे. तर तीन वर्ग खोल्या मुलांसाठी आणि तीन खोल्या मुलींसाठी राहण्याकरीता असून, शाळेला स्वःतासाठी इमारत नसल्याने भाडेतत्त्वावर शाळा व आश्रमशाळेसाठी इमारत घेण्यात आली आहे.
पावसाळ्यात टिपटिप पाणी!
प्राप्त माहितीनुसार, पावसाळ्यात काही खोल्यांमध्ये पाणी टिपकत असते. आश्रम शाळेच्या समोर रस्ता नसल्याने अक्षरशः गाळातून विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत जावे लागते. हिवाळयात थंडीपासून सुरक्षा मिळण्यासाठी कोणतेही व्यवस्था नसते, तसेच रात्री झोपण्यासाठी खाटा नसल्याने अक्षरशः चटई टाकुन झोपावं लागत असल्याचे दयनिय चित्र आहे. निवासस्थान व परिसर स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली असून, पाण्याचा अभाव आणि अस्वच्छतेमुळे विशेषतः विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. त्यातचं शाळेला पक्की अशी संरक्षक भिंत नसल्यामुळे तारेचे कंपाउंड करण्यात आले आहे. तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या निवासस्थातील खिडक्यांना जाळ्या बसवण्यात आल्या नाहीत.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित निवासाची सुविधा मिळणे अपेक्षित असताना आश्रमशाळेतील परिस्थिती मात्र चिंताजनक बनली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांकडे संस्था चालकासह प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
केवळ कागदोपत्री सुविधा दाखवण्याऐवजी प्रत्यक्षात आश्रमशाळेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता, सुरक्षित निवास आणि इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पालक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर
विद्यार्थिनींच्या आश्रमशाळेत महिला अधीक्षिका नसल्याची बाबही समोर येत आहे. मुलींच्या निवासाच्या ठिकाणी महिला कर्मचारी किंवा अधीक्षिकेची आवश्यकता असताना ही व्यवस्था का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे.तर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने पाहून तातडीने आवश्यक व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.