

अमोल बी गव्हाणे
श्रीगोंदा: लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या बाजार भावामुळे चांगले दिवस आले आहेत. घाऊक बाजारात लिंबाने १३० ते १५० रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे. किरकोळ बाजारात एका लिंबाची किंमत ७ ते १० रुपयांवर पोहोचली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र गेल्या अनेक महिन्यांनंतर खऱ्या समाधानाचे हास्य फुलले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करता श्रीगोंदा तालुका हा लिंबू उत्पादनात निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील एकूण लिंबू क्षेत्रापैकी एकट्या श्रीगोंदा तालुक्याचा वाटा अधिकचा आहे. बेलवंडी, कोळगाव, येळपणे, घारगाव, लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी, हंगेवाडी ,आढळगाव या भागात शेकडो हेक्टरवर साई सरबती, कागदी लिंबू या जातींच्या बागा आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल या एका पिकातून होते. कमी पाणी, कमी मजूर आणि वर्षातून ३ ते ४ वेळा येणारा बहार हा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पिवळे सोने' ठरला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस आणि कॅंकर, डिंक्या रोगामुळे अनेक बागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाजारातील आवक ३० ते ४०% ने घटली.परिणामी त्याचा भावावर परिणाम झाला. दरवाढ असली तरी अडचणी कायम आहेत. बनावट औषधे, खते, मजुरांची टंचाई, आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे कोल्ड स्टोरेजचा अभाव. भाव पडल्यावर लिंबू टिकवण्याची सोय नसल्याने शेतकऱ्यांना कमी भावात विकावे लागते. तसेच लिंबावर प्रक्रिया उद्योग (ज्यूस, लोणचे, साल) श्रीगोंद्यात नसल्याने शेतकऱ्यांना फक्त कच्च्या मालावर अवलंबून राहावे लागते.
लिंबाचे हे तेजीमंदीचे चक्र असले तरी, श्रीगोंद्याचा लिंबू आता ब्रँड होत आहे. जर शासनाने येथे लिंबू प्रक्रिया उद्योग, शीतगृह आणि निर्यात सुविधा उपलब्ध करून दिली, तर श्रीगोंदा तालुका खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची 'लिंबूधानी' बनेल. मात्र गेल्या काही वर्षात शेतकरी इतर फळबागांकडे वळला आहे. फळबागावर वारंवार फवारणी करावी लागत असल्याने त्याचा फटका थेट लिंबू उत्पादनावर झाला आहे.
श्रीगोंद्याच्या लिंबाचे जी आय टॅगिंग कधी?
श्रीगोंद्याच्या लिंबाची गुणवत्ता आणि देशपातळीवरील ओळख पाहता, याला आता अधिकृतपणे 'श्रीगोंदा लिंबू' म्हणून GI टॅग (Geographical Indication) मिळणे गरजेचे आहे. जसे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला, नागपूरच्या संत्र्याला आहे, तसे श्रीगोंद्याच्या लिंबाला मिळाले तर ,आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात शक्य होईल. बनावट लिंबू 'श्रीगोंदा' नावाने विकता येणार नाही. शेतकऱ्यांना शासकीय अनुदान, प्रक्रिया उद्योगासाठी मदत मिळेल.यासाठी लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
लिंबाच्या भावात चढ-उतार ही चालूच असते.आता लिंबाला चांगला भाव आहे. लिंबू उत्पादनातून शेतकऱ्याच्या कुटुंबाला स्थिरता प्राप्त होते हे नाकारून चालणार नाही. लिंबू उत्पादनातून मोठा आर्थिक हातभार लागतो.
अशोक ढवळे, लिंबू उत्पादक
पूर्वी फक्त पुणे-मुंबईच्या बाजारापुरती मर्यादित असलेली श्रीगोंदा तालुक्यातील लिंबाची ओळख आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. देशातील वाढती मागणी आणि उत्कृष्ट दर्जामुळे 'श्रीगोंद्याचे लिंबू' हे नाव आता एक ब्रँड झाला आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, तामिळनाडू पर्यंत श्रीगोंद्याच्या लिंबाला मागणी आहे.
अतुल लोखंडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा
सध्या बंगलोर, चेन्नई, कोईमतुर या भागात लिंबू पाठवत आहोत. तिथे ग्राहक खास 'श्रीगोंदा क्वालिटी' म्हणून मागणी करतात. दीडशे रुपये किलोचा दर असूनही परराज्यातून ऑर्डर थांबत नाहीत.लिंबाची वाढती मागणी लक्षात घेता पुढील काही दिवसात लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नवनाथशेठ शिंदे, लिंबू व्यापारी,आढळगाव