अहिल्यानगर : जिल्ह्यात रविवारी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली. एकाच दिवशी सरासरी 81.8 मिलिमीटर झालेल्या पावसाने जिल्हाभरात हाहाकार उडवून दिला आहे. या मुसळधार पावसाने पाच जणांचा बळी घेतला. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. बहुतांश तालुक्यांतील गावपातळीवरील पूल पाण्याखाली गेले असून, ठिकठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसाचे पाणी घरादारांत शिरले असून, गोरगरीब जनतेच्या घरांना गळती लागली. सीना नदीला पूर आल्यामुळे अहिल्यानगर शहरात पाणी शिरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Latest Ahilyanagar News)
दरम्यान, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. राहाता तालुक्यात तब्बल 150.8 मिलिमीटर पाऊस झाला. या तालुक्यातील रस्ते पाण्याखाली गेल्याने 25 गावांची वाहतूक दिवसभर ठप्प होती. या तालुक्यातील 227 घरांत पाणी शिरल्याने 1234 लोकांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
नगर, राहाता, राहुरी, जामखेड आदी तालुक्यांत शनिवारी सायंकाळपासूनच पावसास प्रारंभ झाला. रविवारी मध्यरात्रीपासूनच जिल्हाभरात सर्वदूर पावसास प्रारंभ झाला. रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. गेल्या कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्हाभरात एकाच दिवशी सरासरी 81.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील सर्वाधिक 150 मिलिमीटर पाऊस राहाता तालुक्यात झाला आहे. या तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील 25 गावांतील वाहतूक ठप्प होती. या तालुक्यातील साकुरी नाल्यात दोन जण वाहून गेले.
जामखेड तालुक्यात देखील अतिवृष्टीमुळे गावपातळीवरील 16 रस्ते पाण््याखाली गेले. त्यामुळे या तालुक्यातील वाहतूक ठप्प झाली आहे. या तालुक्यात भिंत अंगावर पडून एक महिला दगावली. नेवासा तालुक्यातही भिंत अंगावर पडून एक महिला मरण पावली. नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे पूल ओलांडताना एक जण वाहून गेल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
अहिल्यानगर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता या नऊ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे या तालुक्यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, संगमनेर व अकोले या पाच तालुक्यांतदेखील मुसळधार पाऊस झाला आहे. या तालुक्यांत सरासरी 52 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
प्रवरा संगम व सलाबतपूर मंडळांत 200 मिलिमीटर
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी महसूल मंडलात सर्वांत कमी सरासरी 32.3 मिलिमीटर पाऊस झाला. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम व सलाबतपूर या दोन महसूल मंडळांत सर्वाधिक सरासरी प्रत्येकी 199.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल राहाता तालुक्यातील राहाता व अस्तगाव मंडलात प्रत्येकी 167.3 मिलिमीटर नोंद झाली आहे. लोणी मंडलात 166.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
83 महसूल मंडलांत अतिवृष्टी
जिल्ह्यात 124 महसूल मंडळे असून त्यापैकी 83 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये नगर तालुक्यातील सर्वच 12, राहाता तालुक्यातील सर्वच सहा, नेवासा तालुक्यातील सर्वच दहा, श्रीरामपूर तालुक्यातील सर्वच पाच, राहुरी तालुक्यातील सर्वच 8, शेवगाव तालुक्यातील सर्वच 8, पाथर्डी तालुक्यातील सर्वच 9 मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. जामखेड तालुक्यातील सात, कर्जत तालुक्यातील चार, पारनेर तालुक्यातील 5, कोपरगाव तालुक्यातील 5, श्रीगोंदा तालुक्यातील दोन, संगमनेर तालुक्यातील एका मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
शनिशिंगणापूर ः परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जलमय झालेले शनिमंदिर आणि परिसर. (छाया ः भागवत बनकर)