अहिल्यानगर : जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून धो धो बरसत असलेल्या पावसाने खूपच विदारक चित्र निर्माण झाले आहे. बहुतांश तालुक्यांतील शेतात, गावांत, घरांनी, बाजारपेठेत आणि उभ्या पिकांमध्ये पाणीच पाणी पाहावयास मिळाले. नद्या, नाले, बंधारे तुडुंब भरून.. पातळी ओलांडत... ओसंडून वाहताना नागरिकांची दैना उडाली. दहा दिवसांत झालेल्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, बळीराजांची खरीप हंगामातील पिकांबाबतची सोनेरी स्वप्न अन् मेहनतीचा घाम पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. (Latest Ahilyanagar News)
13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात 46 टक्के म्हणजे सरासरी 205 मिलिमीटर पावसाच्या 46 टक्के ‘रेकॉर्ड ब्रेक’ पावसाची नोंद झाली आहे. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, नगर, कर्जत आदी तालुक्यांतील विविध ठिकाणी पूल, रस्ते वाहून गेले. महामार्ग बंद, तलाव फुटले, गावागावांतील घरांनी, दुकानांनी, उभ्या पिकांमध्ये पाणीच पाणी झाले. जनावरे दगावली, माणसे वाहून गेली. अनेक नागरिक पुरात अडकले. पुरामुळे संसारोपयोगी साहित्य, धान्यसाठा, मुक्या जनावरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला.
पाथर्डी, कर्जत, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, अहिल्यानगर, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर, राहाता या अकरा तालुक्यांतील 3 लाख 10 हजार 337 हेक्टर क्षेत्रावरील बाजरी, कापूस, मका, मूग, उडीद, कांदा, भाजीपाला पिकांबरोबरच संत्रा, डाळिंब, सीताफळ या फळबागांचे नुकसान झाले. त्यामुळे 4 लाख 47 हजार 398 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत. शेवगाव, पाथर्डी, जामखेड, नगर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद 170 टक्के पाथर्डी तालुक्यात झाली आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 448.1 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. आजपर्यंत 488.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकंदरीत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, 109 टक्के नोंद झाली आहे. 13 सप्टेंबरपर्यंत 281.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या दहा दिवसांतच 205.7 मिलिमीटर पाऊस पडला असून, वार्षिक पावसाच्या तुलनेत 46 टक्के पाऊस दहा दिवसांतच झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आतापर्यंत नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी व नेवासा या आठ तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे.
पुरामुळे सर्वत्र हाहाकार पहावयास मिळाला. तलाव, बंधारे, नाले ओव्हर फ्लो झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पूर परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता तर अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष पथकाची मदत घेण्यात आली. बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहेत. सरसकट मदत तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.
तालुकानिहाय पाऊस
अहिल्यानगर- 528.3, पारनेर- 454.3, श्रीगोंदा- 491.9, कर्जत- 587, जामखेड- 655.1, शेवगाव- 675.4, पाथर्डी- 807.1, नेवासा- 561.8, राहुरी- 341.2, संगमनेर- 271.7, अकोले 391.1, कोपरगाव- 269.2, श्रीरामपूर- 374.7, राहाता- 355.4. (मिलिमीटर)