नगर : जिल्ह्यातील 17 रक्त पेढ्यांमध्ये वेगवेगळ्या गटाच्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात, सर्वच रक्त गटांसाठी संजीवनी ठरणारा ‘ओ निगेटीव्ह’ या गटाचे रक्त जिल्ह्यात एकाही रक्तपेढीत शिल्लक नसल्याची चिंताजनक बाबही पुढे आली आहे. तर, ओ पॉझिटिव्ह रक्त सिव्हील, डॉ. विखे फौंडेशन आणि अर्पण संगमनेर या तीनच पेढ्यांमध्ये तेही काही दिवस पुरेल इतकेच उपलब्ध आहे.
जिल्ह्यात 14 ट्रस्ट आणि तीन शासकीय रक्तपेढ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात रक्त संकलन आणि मागणीनुसार पुरवठा केला जातो. यामध्ये जिल्हा रुग्णालय, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन विळद घाट, अर्पण ब्लड सेंटर, संगमनेर, अहमदनगर ब्लड सेंटर, संजीवनी ब्लड सेंटर कोपरगाव, अष्टविनायक ब्लड बँक नगर, आनंदऋषि ब्लड सेंटर नगर, जनकल्याण ब्लड सेंटर नगर, रोटरी ब्लड सेंटर, राहुरी, लक्ष फौंडेशन नगर, साईनाथ ब्लड सेंटर, शिर्डी, प्रवरा मेडीकल ट्रस्ट लोणी, साईसेवा ब्लड सेंटर नगर, डॉ.जोंधळे नित्यसेवा ब्लड सेंटर, नगर, सुरभी ब्लड सेंटर नगर, सपोर्ट ब्लड सेंटर संगमनेर यांचा समावेश आहे.
ए पॉझिटिव्ह या रक्तगटचे रक्त फक्त विखे पाटील फौंडेशनकडे शिल्लक आहे. ए निगेटिव्ह फक्त जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असल्याचे दिसते. तसेच ए बी पॉजिटिव्ह जे प्लाझ्मासाठी महत्वाचे असते ते सिव्हील सोडून कुठेही नाही. तसेच एबी निगेटिव्ह हे जिल्ह्यात कोठेही शिल्लक नाही.
प्रशासनाला रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जनजागृतीचा विसर पडला आहे. रक्तपेढ्याही उदासिन दिसत आहेत. वाढदिवस, वेगवेगळे कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यासंदर्भात पुरेशी जागृती करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसते आहे. त्यामुळेच ही रक्तटंचाई जाणवू लागल्याचे बोलले जाते.
ओ निगेट्व्हि या गटाचे रक्त सर्वच रुग्णांसाठी जीवदान देणारे ठरत आहे. अपघात झालेल्या व्यक्तींना, गंभीर रक्तस्त्राव, प्रसुतीप्रसंगी, नवजात बाळांच्या उपचारासाठी, ज्यांची रक्तगट तपासणी झाली नाही, त्यांच्यासाठी ओ निगेटिव्ह रक्त गरजेचे असते. मात्र, काल दुपारपर्यंत जिल्ह्यातील एका रक्तपेढीत हे रक्त शिल्लक नसल्याचे समोर आले. बी निगेटिव्हही कुठेच शिल्लक नाही.
ओ आणि बी पॉझिटीव्हि रक्तगट हा केवळ जिल्हा रुग्णालय, डॉ. विखे पाटील आणि अर्पण रक्त पेढी संगमनेर या तीनच ठिकाणी शिल्लक आहे. जिल्हा रुग्णालयात 300 बॅग असल्याचा दावा केला जातो. तर दररोज सरासरी 30 बॅगची मागणी असते. त्यामुळे 10 दिवस पुरेल, एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याचे समजले.