Water Tanker Pudhari File photo
अहिल्यानगर

Nagar Water Crisis: नगर जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर; 87 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

42 अंशांवर तापमान; वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई गंभीर, 1.45 लाख लोकसंख्या टँकरवर अवलंबून

पुढारी वृत्तसेवा

नगर: उष्णतेचा पारा 42 अंशांच्या वर पोहचला आहे. उन्हाच्या तडाख्यासोबतच जलस्रेोतही काहीसे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळेच पाणी टंचाईच्या झळाही तीव्र होऊ लागल्या आहेत. परिणामी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 26 गावे आणि 120 वाड्यांसाठी 32 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.

मात्र मे महिन्यात 87 गावे आणि 436 वाड्यांना सुरू करावा लागला आहे. त्यासाठी टँकरची संख्याही 67 करण्यात आली असून, 21 दिवसांत 35 टँकर वाढल्याचे चित्र आहे. लोकांच्या मान्सूनकडे नजरा लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात 25 एप्रिल रोजी साधारणतः संगमनेर, नगर, पारनेर आणि पाथर्डी अशा चार तालुक्यातील 26 गावे आणि 120 वाड्यांना 32 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.

यातून 45 हजार लोकसंख्येची तहान भागवली जात होती. मात्र, पुढे पाणी टंचाईची समस्या आणखी तीव्र होऊ लागल्याचे दिसले. दि. 25 एप्रिल ते दि. 17 मे या कालावधीतील 21 दिवसांत 35 टँकर नव्याने सुरू करावे लागले आहेत. यामध्ये अकोले आणि कर्जतमध्येही पाण्याची टंचाईच्या झळा वाढल्याचे दिसले.

एप्रिलमध्ये साधारणतः 32 टँकरद्वारे 45 हजार लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र मे महिन्याच्या 17 तारखेच्या अहवालानुसार, टँकरची संख्या 35 ने वाढून ती 67 झाली असून, या टँकरद्वारे तहान भागणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील 1 लाख 45 हजार इतकी झाली आहे. त्यामुळे 15 दिवसांत आणखी 1 लाख लोकांना टंचाईच्या झळा बसल्याचे दिसले. खासगी विहिरी, बोअरवेल्स ताब्यात घेऊन, त्याद्वारे टँकर भरवले जात आहेत.

गतवर्षीपेक्षा टँकरची संख्या कमीच

गेल्या वर्षी 2025 च्या मे महिन्यात जिल्ह्यात 120 टँकर सुरू होते. सव्वादोन लाख लोकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र यावर्षी ही संख्या कमी आहे. त्यासाठी गतवर्षी चांगला झालेला पाऊस, त्याचबरोबर जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा, निळवंडेसह अन्य छोट्या मोठ्या धरणातून पाण्याचे केलेले योग्य नियोजन, हे कारण समजले जात आहे. यातून गावोगावी तलाव, बंधारे भरून घेतल्याने उन्हाळ्याची दाहकता कमी झाल्याचेही दिसले.

सध्या टँकरग्रस्त गावांतील 80-85 टक्के गावे ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील आहेत आणि 15-20 टक्के गावे ही विहिरीवर आधारित आहेत. टँकरची संख्या आज 15 मेच्या दरम्यान वाढलेली दिसून येते, जुलैपर्यंत ती निरंक होते. प्रत्येक पेयजल स्रेोताचे भूजल अधिनियम 2009 नुसार संरक्षण केले गेले पाहिजे.
अजिंक्य काटकर, भूजल वैज्ञानिक, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT