Ahilyanagar Jilha Parishad Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagr ZP Properties Encroachment: जिल्हा परिषदेच्या २८७१ मालमत्ता; अतिक्रमणाचा वाढता विळखा

कागदावर नोंदी, प्रत्यक्षात जागा गायब; अतिक्रमणमुक्तीसाठी कारवाईची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक मालमत्तांवर अतिक्रमणे झालेली आहेत. काही ठिकाणी परस्पर या जागांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे जि.प. दप्तरी नोंद असलेल्या किती जागा आजमितीला संरक्षित आहेत, हे शोधण्यासाठी प्रशासनाने मध्यंतरी विशेष मोहीम राबवली.

त्यानुसार, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामपंचायतींकडे 2871 मालमत्ता आढळल्या आहेत. यामध्ये मोकळ्या जागा आणि इमारतींचा समावेश आहे. मात्र, काही ठिकाणी कागदावर नोंदी आहेत, तर प्रत्यक्षात जागाच नसल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे जि.प. मालकीच्या जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सीईओ पाऊले उचलणार का, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या तत्कालिन अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी 2019-20 मध्ये झेडपी मालकीच्या मोकळ्या जागा आणि इमारतींच्या मालमत्तेची माहिती पुस्तिका तयार केली होती. प्रशासनाने त्या मालमत्ता अतिक्रमणमुक्त करणे अपेक्षित होते. मात्र, ती पुस्तिकाच रहस्यमयरित्या गायब झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सीईओ आनंद भंडारी यांनी काही दिवसांपूर्वी या विषयाला हात घातला. जि.प. मालकीच्या जागांचा पाहणी करून नोंदी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यातून सेसच्या उत्पन्न वाढीसाठीही या मालमत्तेचा उपयोग होणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील 14 तालुक्यांतून ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी ही माहिती मागावली होती. त्यानुसार, प्राप्त माहिती जिल्हा परिषदेच्या ई-बुकमध्ये सामाविष्ट करण्यात आली आहे. अतिक्रमण झालेल्या जागांचे काय करणार, विनापरवानगी वाटप केलेल्या जागा परत कशा घेणार, याविषयी लक्ष लागले आहे.

अकोले, पारनेर, श्रीगोंद्यात अनेक मालमत्ता

आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत आणि महिला बालकल्याण विभागाची जिल्ह्यात 2871 मालमत्ता असल्याच्या नोंदी मिळाल्या आहेत. यात, पारनेर 579, श्रीगोंदा 457, जामखेड 48, शेवगाव 200, नेवासा 121, राहुरी 183, राहाता 65, संगमनेर 33, अकोले 1123 मालमत्तांचा समावेश आहे. काही तालुक्यांची संपूर्ण माहिती येणे बाकी आहे. त्यामुळे झेडपीच्या मालमत्तांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT