Girls Students Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Zilla Parishad Free MS-CIT Training: अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय; 600 हून अधिक मुलींना मोफत MS-CIT प्रशिक्षण

12 वर्षांनंतर योजना पुन्हा सुरू; जिल्हा परिषदेच्या 30 लाखांच्या निधीतून आठवी ते बारावीतील विद्यार्थिनींना डिजिटल कौशल्यांची संधी

पुढारी वृत्तसेवा

नगर: डिजिटल युगात संगणक साक्षरता ही काळाची गरज बनली असताना, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने आठवी ते बारावीतील मुलींसाठी मोफत एमएस-सीआयटी संगणक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी सुमारे 30 लाखांची तरतूद करण्यात आली असून, जिल्ह्यातील सुमारे 600 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक मुलींना संगणक प्रशिक्षण घेणे आर्थिक कारणांमुळे शक्य होत नाही. अशा विद्यार्थीनींसाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून पुर्नविनियोजनातून एक महत्वपूर्ण योजना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि रोजगाराच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या उद्देशातून संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा हा उद्देश आहे. संगणक प्रशिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थिनीवर सुमारे 5 हजारांचा सेसमधून खर्च करण्यात येणार असून, संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी एमकेसीएल आणि जिल्हा परिषद यांच्यात करार करण्यात येणार आहे. एमकेसीएलच्या माध्यमातूनच विद्यार्थिनींना हे प्रशिक्षण मिळणार असल्याने या योजनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, एमएस-सीआयटी प्रमाणपत्रामुळे संगणकाचे मूलभूत ज्ञान, इंटरनेटचा वापर, ऑनलाइन सेवा, ई-गव्हर्नन्स, कार्यालयीन कामकाज आणि विविध डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. आज अनेक सरकारी व खासगी नोकऱ्यांमध्ये संगणक ज्ञानाला प्राधान्य दिले जात असल्याने या प्रशिक्षणाचा विद्यार्थिनींना दीर्घकालीन फायदा होणार आहे.

एका तपानंतर योजना पूर्ववत

तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता ग्रामीण भागातील मुलींना डिजिटल प्रवाहाशी जोडणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी तब्बल 12 वर्षानंतर ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत केले जात आहे. मुलींच्या डिजीटल शिक्षणाला चालना देतानाच त्यांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सीईओंच्या मार्गदर्शनात सातवी ते बारावी पास मुलींसाठी संगणक प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी सेसमधून आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील साधारणतः 600 पेक्षा अधिक विद्यार्थीनींना योजनेचा लाभ मिळू शकेल.
संजय कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म.बा.क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT