नगर: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग फेरपडताळणीच्या आदेशानुसार, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 514 कर्मचाऱ्यांचीही दिव्यांगत्व पडताळणी केली जाणार आहे. यातील 453 कर्मचाऱ्यांची नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बुधवार दि. 9 सप्टेंबरपासून तपासणी होणार आहे. कर्णबधीर 61 कर्मचाऱ्यांना पुणे-मुंबईला पाठवले जाणार असल्याचेही समजले. आरोग्य सेवा, नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन दिव्यांग तपासणीसाठीचे नियोजन कळवले आहे.
दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, विविध पदभरती प्रक्रियेत दिव्यांग़ उमेदवारासाठी वैश्विक ओळखपत्र प्रमाणपत्र पडताळणी व पुन्हा दिव्यांग वैद्यकीय तपासणी बंधनकारक केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिव्यांग पडताळणीसाठी 120 दिवसांची कालमर्यादा घालून दिली आहे. फेरतपासणीसाठी अपिलीय वैद्यकीय महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेने दि. 25 जून 2026 रोजी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना लेखी पत्र पाठवून 514 कर्मचाऱ्यांच्या तपासणीसाठी दिनांक आणि वेळेचे नियोजन करावे, असे कळवले होते. त्या पत्रानंतर नुकतेच आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून दि. 9 सप्टेंबरपासून तपासणी करण्यासाठी नियोजन कळवले आहे.
कर्णबधीर ६१ कर्मचाऱ्यांची तपासणी कुठे?
कर्णबधीर प्रवर्गातील 61 कर्मचाऱ्यांची नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ‘बेरा टेस्ट’चे मशीन नादुरुस्त असल्याने तपासणी शक्य नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची तपासणी ही पुणे की मुंबईला करायची, याबाबत सीईओ आनंद भंडारी मार्गदर्शन मागवणार असल्याचेही समजते. मात्र उर्वरित 453 कर्मचाऱ्यांची तपासणी नाशिकला होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
‘त्या’ 218 कर्मचाऱ्यांची फेरतपासणी
आतापर्यंत 218 कर्मचाऱ्यांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. यापैकी 17 कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्याने त्यांचे निलंबनही करण्यात आले होते. याच वेळी नाशिक येथेही 41 कर्मचाऱ्यांची यादी तपासणीसाठी पाठविण्यात आली होते. यापैकी 29 कर्मचारीच तपासणीला गेले, त्यांचे पडताळणी अहवालही नगर जिल्हा परिषदेला आले, मात्र उवर्रीत 12 कर्मचारी तिकडे फिरकलेच नाहीत. आता या आदेशाने 218 सह नाशिकच्या ‘त्या’ 29 जणांनाही पुन्हा तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.
दररोज होणार 50 कर्मचाऱ्यांची तपासणी
दि. 9 ते दि. 30 सप्टेंबर या कालावधीत ही पुनर्पडताळणी करण्यात येणार आहे. दररोज 50 कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. पहिली दोन दिवस अल्पदृष्टी, त्यानंतर सात दिवस अस्थिव्यंग आणि शेवटचा दिवस हा इतर दिव्यांग यादीतील कर्मचाऱ्यांच्या तपासणीसाठी असणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनाही तपासणीबाबत सूचना करण्यात आल्या असून, दिलेल्या तारखेला सकाळी 10 वाजता नाशिकला हजर राहण्याचेही कळविण्यात आले आहे.