Ahilyanagar Women Bravery Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Women Bravery: मातृत्वाचा महापूर! साडीचा दोर करून जीवदान, बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याला खेचून आणले

अहिल्यानगरातील दोन थरारक घटनांत स्त्रीशक्ती, ममत्व आणि धैर्याचा अद्वितीय प्रत्यय; संकटसमयी महिलांनी ठरवला जीवनरक्षक निर्णय

पुढारी वृत्तसेवा

गौरव साळुंके, उपसंपादक, पुढारी

नाकात पाणी जाऊ लागले, की माकडीन आपल्या पिलाला पायाखाली घेते आणि स्वतःचा जीव वाचवते, असे उदाहरण देऊन माणसाच्या वृत्तीलाही ते लागू करण्याचा प्रयत्न समाजात नेहमी केला जातो. पण हे गृहितक माणसाला पूर्णतः लागू होऊ शकत नाही, हे अनेक उदाहरणांवरून वारंवार सिद्ध झाले आहे. खास करून मातृत्व नेहमी पिलाला वाचविण्यासाठीच श्रेष्ठत्वाला पोहचले आहे. स्त्रीत्वातील मातृत्वाचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारी दोन उदाहरणे... आपल्याच जिल्ह्यातील... ‘पुढारी’च्या वर्धापन दिनानिमित्त... ‘अहिल्येच्या लेकी’ या विशेषांकाच्या पार्श्वभूमीवर...

अहिल्यानगर जिल्ह्यातील गोदावरी आणि प्रवरा परिसरात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या दोन घटना याचाच प्रत्यय देतात. पहिल्या घटनेत नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या तरुणांना शेळ्या चारणाऱ्या महिलेने अंगावरील साडी फेडून जीवनदान दिले. तर दुसऱ्या घटनेत हिंस्त्र बिबट्याच्या जबड्यात अडकलेल्या चिमुकल्याला त्याच्या आई आणि आजीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सोडवले. या दोन घटनांतील समान धागा म्हणजे स्त्रीचे धैर्य, मातृत्व आणि संकटसमयी घेतलेला क्षणाचा निर्णय.

ही घटना कोपरगाव तालुक्यातील कारवाडी-मंजूर परिसरातील. मागील वर्षीची ही घटना बहुतेक कोणाच्या आता लक्षातही नसेल. दारणा धरणातून गोदावरी नदीत विसर्ग वाढला होता. नदीचा प्रवाह वाढत होता. नदीतून शेतीसाठी पाणी नेण्यासाठी काठावर ठेवलेल्या मोटारी बुडण्याची भीती होती. त्यामुळे आपापल्या मोटारी शेतकरी काढून घेऊ लागले. त्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास संतोष, अमोल आणि प्रदीप तांगतोडे हे तिघे भाऊ आणि त्यांचे नातेवाईकही मोटारी काढण्यासाठी गेले. मात्र मोटारी काढत असताना पाण्याची पातळी आणि वेगही वाढला. मोटारी काढण्यासाठी पुरात उतरलेले तिघे भाऊ प्रवाहात अडकले. ते जिवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारू लागले. नदीच्या वेगवान प्रवाहात त्यांचे हात हवेत झेपावत होते. आजूबाजूला मदतीला कोणी नव्हते. नदीकाठापासून दूरवर शेळ्या चारत असलेल्या ताईबाई आणि त्यांचे पती छबूराव पवार यांचे मात्र तिकडे लक्ष गेले. तीन-चार जण पुरात वाहून जात असल्याचे त्यांच्या हातांवरून त्यांनी ओळखले. क्षणासाठीही न थांबता दोघे नदीकडे धावत सुटले. ताईबाईंनी आजूबाजूला दोरी, काठी किंवा अन्य काही साधन मिळते का ते पाहिले. पण हाताशी काहीच नव्हते.

त्या वेळी त्यांनी घेतलेला निर्णय विलक्षण होता. त्यांनी स्वतःच्या अंगावरील साडी फेडली आणि तिचे एक टोक पुरात जीवासाठी झुंजणाऱ्या तरुणांच्या दिशेने फेकली. साडीचे दुसरे टोक त्यांनी आणि छबूराव यांनी घट्ट पकडून ठेवले. वेगवान पाण्याशी झुंज देत असलेल्या अमोल आणि प्रदीप यांनी त्या साडीचे एक टोक पकडले आणि पवार दाम्पत्याने त्यांना हळूहळू काठावर खेचून आणले. मात्र त्यांचा भाऊ संतोष तांगतोडे मात्र तोपर्यंत पुरात दूरवर वाहून गेला होता.

रात्रभर आणि दुसऱ्या दिवशीही शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; पण त्याच वेळी दोन कुटुंबांचे दिवे विझता विझता तेवते राहिले ते केवळ ताईबाईंच्या धाडसामुळे. अंगावरची साडी फेडून बुडत्याला वाचवणाऱ्या ताईबाई म्हणजे त्या दोन कुटुंबांसाठी देवदूतच ठरल्या... स्वतःच्या सन्मानाची, जीवाची किंवा परिणामांची पर्वा न करता दुसऱ्याच्या प्राणांसाठी धावून जाणे हीच तर स्त्रीत्वाची खरी ओळख आहे, हे ताईबाईच्या रूपाने पुन्हा सिद्ध झाले.

दुसरी घटना संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील. ईश्वरालाही मोह व्हावे असे स्त्रीत्वाचे रूप असलेल्या मातृत्वाने हिंस्त्र बिबट्यालाही माघार घ्यायला भाग पाडल्याची ही घटना. शेडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. उसाच्या दाट शेतांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला होता. एके दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भारती फड आणि त्यांची आई सखुबाई नागरे जनावरांसाठी घास कापण्यासाठी शेतात निघाल्या होत्या. त्यांच्या मागून चार वर्षांचा श्रीराज आणि त्याच्याहून थोडीशी मोठी बहीण स्वराली हातात मोबाईल बघत चालत होते. शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सर्वांत पाठीमागे असलेल्या श्रीराजवर झडप घातली. काही समजण्याच्या आत बिबट्या श्रीराजला जबड्यात पकडून उसात पळाला.

श्रीराजच्या जवळूनच चालत असलेल्या स्वरालीने मात्र झेप घेणारा, श्रीराजला जबड्यात पकडून उसात जाणारा बिबट्या पाहिला आणि जिवाच्या आकांताने ओरडली... ‘आईऽऽऽ, दादाला वाघानं धरलं..’

पुढच्या क्षणाला त्यांची आई भारती आणि आजी सखुबाई यांनी जे केलं, ते अविश्वसनीय, अतुलनीय होतेच; पण ममतेचे आणि धाडसाचे अविस्मरणीय उदाहरणच ठरले. दोघीही आरडाओरडा उसात बिबट्याच्या मागे धावल्या. मदतीसाठी ओरडत त्या धावत होत्या आणि मुलाला सोडवण्यासाठी बिबट्याचा पाठलाग करत होत्या. श्रीराजला घेऊन पळणाऱ्या त्या हिंस्त्र बिबट्याला मायलेकींनी गाठलेच आणि त्याच्याहून जास्त त्वेषाने निर्भयपणे त्याचा प्रतिकारही केला. त्यांच्या आक्रमक प्रतिकारामुळे श्रीराजला सोडून पलायन करण्याशिवाय बिबट्यापुढे जणू पर्यायच राहिला नाही.

तोपर्यंत चिमुकल्या श्रीराजच्या मानेवर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. मात्र, त्याचा जीव वाचला. फड यांच्या घराशेजारी सुरू असलेल्या कामावरील बांधकाम कामगारांनी श्रीराजला तत्काळ लोणी येथे प्रवरा रुग्णालयात आणि नंतर मामा शुभम नागरे व अनिल सांगळे यांच्या मदतीने पुण्यातील खासगी रुग्णालयात नेले. श्रीराजचा जीव वाचला. नव्हे; वाचवला... एका मातेने आणि मातेच्या मातेने... हिंस्त्र प्रवृत्तीपुढे मातृत्व सरस असते हे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले.

माणुसकीव­रचा विश्वास दृढ

या दोन्ही घटना एकत्र पाहिल्या तर एक गोष्ट स्पष्ट होते. धैर्य कोणत्याही पदामुळे, संपत्तीमुळे किंवा शिक्षणामुळे येत नाही. ते मनाच्या ताकदीतून आणि संस्कारांतून जन्माला येते.‌ किंबहुना स्त्रीत्वात जन्मजात असलेल्या ममत्वातून येते. ताईबाई पवार या एक साध्या महिला शेतमजूर, मेंढपाळ; तर भारती फड आणि सखुबाई नागरे सर्वसामान्य शेतकरी. ताईबाईंनी ज्यांना वाचवले ते तर त्यांच्या ओळखीचेही नव्हते... पण जीव वाचवण्यासाठी ओळखीची गरजच काय, हे ताईबाईंचेच वाक्य आपल्याला अंतर्मुख करून जाते.

गोदावरीच्या पुरात साडीचे दोर बनवणारी ताईबाई असो किंवा बिबट्याच्या तावडीतून मुलाला खेचून आणणारी आई-आजी असो, यांनी कोणतीही प्रसिद्धी किंवा सन्मान डोळ्यांसमोर ठेवला नव्हता. त्यांच्या मनात एकच विचार होता की हा जीव वाचलाच पाहिजे. हीच भावना त्यांना असामान्य बनवते. अशा महिलांमुळेच समाजातील माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ होतो आणि संकटाच्या काळात आशेचा किरण दिसतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT