नगर: प्रसिध्द प्रारुप मतदारयादीवर ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्हाभरातून ८२ हजार २३२ दावे व हरकती दाखल झालेल्या असून, यामध्ये ५३ हजार ६३७ नवीन मतदारनोंदणीसाठी दाखल अर्जांचा समावेश आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आता १३ नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती सादर करण्यास मुभा दिली आहे. मुदतवाढ दिल्याने अंतिम मतदारयादी १६ नोव्हेंबरऐवजी आता ३० नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे.
मतदारयादी पूर्णपणे बिनचूक आणि पारदर्शक तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हाभरात मतदारयादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम (एसआयआर) राबविण्यात आली. त्यासाठी बीएलओंनी घरोघरी जात मतदारांकडून गणना प्रपत्र प्राप्त केले.
दरम्यान, अर्ज उपलब्ध न झालेल्या जिल्हाभरातील जवळपास ४ लाख २६ हजार मतदारांना वगळून जिल्हा निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ३३ लाख ८३ हजार १८७ मतदारसंख्या असलेली प्रारुप मतदारयादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली. या यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती सादर करण्याची संधी दिली होती. दरम्यान, आयोगाने १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आयोगाने पुन्हा या कार्यक्रमास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार नागरिकांना आता १३ नोव्हेंबरपर्यंत मतदारनोंदणी करता येणार आहे.
जिल्हाभरातून नवीन मतदारनोंदणीसाठी ३० ऑक्टोबरपर्यत एकूण ८२ हजार २३२ दावे व हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये वगळणीसाठी ४ हजार ८४९ व दुरुस्तीसाठी २३ हजार ७४६ तर नवीन नोंदणीसाठी ५३ हजार६३७ अर्जांचा समावेश असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.
नवमतदारनोंदणी अर्ज संख्या
अकोले : ३७२२, संगमनेर : ६९०२, शिर्डी : ४४२०,
कोपरगाव : ३४२८, श्रीरामपूर : ४१९०, नेवासा : ३१२५,
शेवगाव : ५८२५, राहुरी :२८५५, पारनेर : ६४१६,
अहमदनगर शहर : ३९७३, श्रीगोंदा : ३९७८, कर्जत-जामखेड : ४८०३.