Ahilyanagar Unseasonal Rain Crop Damage Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी पावसाचा मोठा फटका; जिल्ह्यात 11 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

143 गावांतील 20 हजार शेतकरी बाधित; नुकसानभरपाईसाठी मागणी वाढली

पुढारी वृत्तसेवा

कैलास शिंदे

नेवासा: जिल्ह्यात सलग दोन दिवस बुधवारी (ता. 18) आणि गुरुवारी (ता. 19) झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे 11 हजार 559 हेक्टरवर नुकसान झाले आहे. यातील 8 हजार 171 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान हे 33 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच 143 गावांतील सुमारे 20 हजार 531 शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील अहिल्यानगरसह अकोले, पाथर्डी, राहुरी, पारनेर, शेवगाव तालुक्यात बुधवारी व गुरुवारी रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काही ठिकाणी गारपीट झाली. पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हासह हरभरा, मका, कलिंगड, खरबूज, आंबा, कांद्याला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील नेवासा, राहुरी, पारनेर, कर्जत,

संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, अहिल्यानगर, पाथर्डी, अकोले तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय कांदा, मका, कलिंगड, खरबूज, हरभरा, वेगवेगळी फुले, फळपिके, आंबा, भाजीपाला, द्राक्ष यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. फळबागांसह पिकांचे नुकसान झाल्याने अनेकांच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत.

कमी नुकसानीचे काय?

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनानेच दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषानुसार 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, तरच मदत मिळते. नुकसान हे नुकसानच असते. कुठल्या निकषावरून ही टक्केवारी ठरवतात? त्यासाठी कसे मोजमाप केले जाते? यासंदर्भात मात्र कुठलीही माहिती शेतकऱ्यांना नाही.

शिवाय नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना या निकषामुळे मदत मिळत नाही. आधीच नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त आहे. त्यात सरकारच्या निकषामुळे अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. झालेले नुकसान पाहून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

143 गावे अन्‌‍ 20531 शेतकरी!

जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार 143 गावांतील 20 हजार 531 शेतकऱ्यांचे 11 हजार 559 हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यात 15 हजार 729 शेतकऱ्यांचे 8171 हेक्टर क्षेत्रावर 33 टक्क्यांपेक्षा जास्त, तर 4 हजार 632 शेतकऱ्यांचे 3026 हेक्टरवर 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान असल्याची प्राथमिक नोंद आहे.

बुधवार-गुरुवार झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनास तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील असून पाठपुरावा करणार आहे.
आ. विठ्ठलराव लंघे
आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या आदेशावरून संबंधित मंडलाधिकारी, ग्रामअधिकारी, ग्रामविकास अधिकारी व कृषी विभागास स्पॉट पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. संजय बिरादार, तहसीलदार, नेवासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT