नगर: विद्यार्थ्यांना शिकवायचे की दिवसभर ऑनलाइन माहिती भरत बसायचे, हातात पुस्तक घ्यायचे की मोबाईलवर येणाऱ्या लिंक आणि अॅपमध्ये अडकून पडायचे? या संतप्त सवालांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. शिक्षकांवर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांचा आणि ऑनलाइन कामांच्या भडीमाराचा उद्रेक मोर्चातून झाला. जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने काढलेल्या आक्रोश मोर्चात सुमारे आठ हजार शिक्षक सहभागी झाले. शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पालकांनीही उपस्थिती लावली.
राष्ट्रीय पाठशाळेपासून सुरू झालेल्या मोर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हातात फलक, फ्लेक्स आणि बॅनर घेऊन महिला शिक्षक अग्रभागी होत्या. वाजंत्रीच्या गजरात, घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हा परिषदेत धडकला. शिक्षण विभागाच्या कारभाराविरोधात महिला शिक्षकांनीही तीव्र रोष व्यक्त केला. काही ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया आणि आक्रमक घोषणांनी वातावरण तापले. रात्रंदिवस मोबाईलवर येणाऱ्या विविध अॅप, लिंक, गुगल फॉर्म, एक्सेल शीट, बीएलओ, एसआयआर, जनगणना आणि अन्य प्रशासकीय कामांच्या सक्तीमुळे शिक्षक त्रस्त असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
'आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या' हा मोर्चाचा मुख्य सूर होता. शिक्षकांच्या मूळ अध्यापनाच्या कामाला प्राधान्य देऊन अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा, अशी मागणी करण्यात आली. शिक्षक हा देशाचा मानबिंदू आहे. त्यालाच रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर सरकारचे कुठेतरी चुकत असल्याचे एमपीएससी आंदोलनाचे प्रमुखचे विवेकानंद पाटील म्हणाले.
खासदार , आमदार तांबेंनी प्रशासनाला खडसावले
जिल्हा परिषदेत झालेल्या सभेत खासदार नीलेश लंके यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. आमदार सत्यजित तांबे यांनीही शिक्षकांची बाजू मांडत प्रशासनाला कडक शब्दांत खडसावले. शिक्षक रस्त्यावर उतरून आक्रोश करत असतील, तर राज्यकर्त्यांनी यातून बोध घ्यावा. शिक्षकांवर अन्याय होत असल्यास विधान परिषदेत आवाज उठविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
बापू तांबेंचा हल्लाबोल
शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यशैलीवर थेट हल्ला चढविला. जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी शिक्षकांना यापुढे त्रास झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा देताना शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सीईओंनी पुढाकार घेतल्याने त्यांच्या अभिनंदनचा ठराव केला. शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले.
यमदेवाच्या वेशभूषेने वेधले लक्ष
शिक्षक मिलिंद खंडीझोड यांनी यमदेवाची वेशभूषा करून अंगावर विविध फलक लावत आंदोलनात सहभाग घेतला. या अनोख्या निषेधाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला शिक्षकांनी आक्रमक भूमिका मांडत शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. चारोळ्या, कविता आणि घोषणांतूनही प्रशासनाविरोधातील नाराजी व्यक्त करण्यात आली.