Ahilyanagar Superintendent of Police Somnath Gharge
नगर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करण्यासाठी पोलिस प्रशासन सदैव अॅक्शन मोडवर आहे. विस्ताराने नगर जिल्हा हा मोठा आहे, त्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. मात्र कारणे देण्यापेक्षा आम्ही गुन्हेगारांवर वचक ठेवून गुन्हेगारी मोडून काढण्यावर भर देणार आहोत. त्यासाठी कठोर पाऊले उचलली जातील, असा इशारा नूतन पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.
अहिल्यानगरचा पदभार घेतल्यानंतर प्रथमच पोलिस अधीक्षक घार्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कुलबर्गे, भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक कोकरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जामखेड आणि नगर शहरातील गोळीबाराच्या घटनांच्या तपासाची पोलिस अधीक्षकांनी सविस्तर माहिती दिली, त्याचबरोबरच गावठी कट्टे आणि त्याचा गुन्हेगारीसाठी होणाऱ्या वाढत्या वापराबाबत त्यांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. चेनस्नॅचिंगचे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक रस्त्यांवर पायी पेट्रोलिंगचा करणार आहोत, शहरातील अवैध रिक्षांवर कारवाईसाठी आरटीओंशी पत्रव्यवहार केला जाईल, शहरातील तसेच अन्य तालुक्यांतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर बंदोबस्तासाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, महिलांच्या तक्रारी संवेदशनील प्रकारे हाताळल्या जातील. त्याच्या तपासात कोणताही विलंब होणार नाही, त्यासाठी सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये आवश्यक सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.
बांगलादेशी घुसखोरांवरील कारवाईबाबत घार्गे यांनी सांगितले, की अॅण्टी टेररिस्ट सेल अंतर्गत याबाबत मोहीम राबविली जाणार आहे. प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासालाही वेग दिला जाईल. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करू, गुन्हेगारांची कोणतीही हयगय केली जाणार आहे, असा सूचनावजा इशारा देतानाच, नागरिकांमध्ये यापुढेही सुरक्षिततेची भावना कायम ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन तत्परतेने काम करील, असा विश्वास घार्गे यांनी दिला.
धार्मिक तणाव निर्माण होऊ न देण्यास पहिले प्राधान्य राहील, असे स्पष्ट करून पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी प्राधान्यक्रम दिल्याचे सांगितले. त्यानंतर क्राईम रेट कमी करण्यावर भर देणे अपेक्षित आहे. तसेच, महिलांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना केल्याचेगही घार्गे म्हणाले.
आर्थिक फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत. यात पतसंस्थांमध्ये ठेवीदारांची फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक दिसते. अशा गुन्ह्यांत जलदगतीने तपास करण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक व त्याच्याशी निगडित अभ्यासू कर्मचाऱ्यांचे वाढीव मनुष्यबळ दिले आहे, असेही घार्गे यांनी सांगितले.