Sugarcane Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Sugarcane Price: अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा संघर्ष पेटणार; शेतकऱ्यांची चार हजारांच्या पहिल्या उचलीची मागणी

साखरेचे दर ५० रुपयांच्या पुढे, तरी कारखानदारांकडून ३१०० ते ३२०० रुपयांचीच उचल; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा शेतकरी संघटनांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नगर: गत वर्षी साखरेचे दर 37-38 रुपये होते. त्या वेळी कारखानदारांनी सरासरी 2900-3000 हजारांची पहिली उचल दिली. यावर्षी गेल्या तीन महिन्यांपासून साखरेचे दर वाढतेच आहे. आज सरासरी 48-50 रुपयांच्या पुढे हे दर आहेत, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 ते 10 रुपये किलोमागे व क्विंटलमागे 900 ते 1000 रुपयांनी दर वाढलेले आहेत. पुढेही दर असेच टिकणार, असे असतानाही कारखानदारांनी साखर उतारा कमी असल्याचे कारण देऊन 3200 च्या पुढे पहिली उचल देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. बैठका केवळ फार्स ठरत आहे, तोडगा निघत नाही. त्यामुळे खा. राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील हा संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात चार हजारांची पहिली उचल मिळावी यासाठी शेतकरी संघटना आक्रमक असताना, एकही साखर कारखानदार त्यासाठी सकारात्मक दिसत नाही. आतापर्यंत आठ कारखान्यांनी आपली पहिली उचल जाहीर केली असून, 3200 च्या पुढे आकडा सरकलेला नाही. दरम्यान, दुष्काळी परिस्थिती, पाणी नाही, ऊस लागवडी कमी आहेत, परिणामी पुढच्या वर्षी गाळप अन् साखरेचे उत्पादनही कमी दिसेल, त्यामुळे किमान दोन वर्षे साखरेचे दर हे बाजारात 50 च्या पुढे स्थिरावण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पहिली उचल 4 हजारांची घेणारच, अशी भूमिका शेतकरी संघटनांची कायम आहे.

जिल्ह्यात या वर्षीच्या गाळप हंगामाला जोर आला आहे. साधारणतः 20 पेक्षा अधिक खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या टोळ्या फडात उतरलेल्या आहेत. शेतकऱ्यांना आपल्या उसाला आपला कारखाना किती भाव देणार, यात पहिली उचल किती असेल, याविषयी ठोस माहिती नाही. त्यामुळे शेतकरीही संभ्रमात आहे. याशिवाय, साखरेचे वाढलेले दर, उपपदार्थाचा नफा, अशा इतर उत्पनांमुळे शेतकरी संघटना पहिली उचल ही चार हजार मिळावी, यासाठी आक्रमक आहे. शेतकरीही पुढे येत आहे. यातून उसदराची आंदोलने पेटती आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी हेही नगरमध्ये आंदोलनात सहभागी होणार असल्याने उसदराची लढाई तीव्र होणार आहे. असे असताना जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करून टाकली आहे.

कारखानदारांचे सूर जुळले..!

आ. आशुतोष काळे यांनी जिल्ह्यात सर्वात अगोदर 3200 रुपयांची पहिली उचल जाहीर केली. याशिवाय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात तसेच आ. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोशी संबंधित जय श्रीराम कारखान्यानेही 3200 रुपयांची पहिली उचल जाहीर केली. तर अशोक, ढाकणे, ज्ञानेश्वर, मुळा, वृद्धेश्वर अशा कारखान्यांनी पहिली उचल ही 3100 रुपये जाहीर केली. मात्र, जाहीर केलेले समान ऊसदर पाहता संबंधित सर्वच कारखान्यांचा साखर उतारा, ऊसतोडणी मजुरी आणि वाहतूक खरेच ‘समान’ आहे का, असा सवाल शेतकरी संघटनांमधून केला जात आहे.

नगरमध्येही ‘कोल्हापूर पॅटर्न’ का नाही?

कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी आठ दिवस कारखाने बंद पाडले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये तातडीने बैठक बोलावली. यातून 3900 रुपयांची पहिली उचल, 100 रुपये कारखाना बंद झाल्यावर आणि दिवाळीला 200 रुपये असा 4200 रुपयांचा तोडगा काढल्याचेही समजले. हेच गणित पाहिले तर नगरमध्ये साखर उतारा कोल्हापूरपेक्षा 1 टक्के कमी असल्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे नाही 3900 तर किमान पहिली उचल ही 3500 रुपये मिळाललाच हवी, अशी बळीराजाची रास्त मागणी आहे. अहिल्यानगरमध्ये शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला अजुनही धार दिसत नाही. त्यामुळेच येथे तोडगा निघालेला नाही का, असाही प्रश्न पुढे येत आहे.

शेतकरी मक्याकडे वळाला तर?

यंदा दुष्काळ आहे, शेतीसाठी पुरेसे पाणी नाही, यामुळे ऊस लागवडी कमी होणार आहेत. म्हणजेच पुढच्या वर्षी गाळपालाही ऊस कमी असेल. परिणामी हेच कारखानदार आपले कारखाने टिकवण्यासाठी पुढच्या वर्षी उसाची पळवापळवी करतील, शेतकऱ्यांना न मागता चार हजारांचा भाव देतील, अशी परिस्थिती आहे. याशिवाय, सध्या सोयाबीन, कापूस, मकाचे भाव चांगले आहेत. यातील मका हे पीक वर्षातून दोन वेळा घेता येते. मक्याला 2800 ते 3200 रुपयांपर्यंत भाव आहे. एकरी 30 क्विटंल उत्पादन होऊ शकते. पाणीही कमी लागते. त्यामुळे शेतकरी जर उसाऐवजी मक्याकडे वळाला तर लागवडी कमी होतील, उसच नसल्याने गाळप करणे अवघड होईल, कारखाने अडचणीत येतील, कारखानदारांसमोर पर्यायही नसेल. त्यामुळे याचवर्षी शेतकऱ्यांना चांगला भाव दिला तरच तो नवीन लागवड करेल, अन्यथा तो मका पिकाकडे वळण्याचा निर्णय घेऊ शकतो.

तफावत दिसल्यास तक्रार करा : दराडे

शेतकऱ्यांना आपल्या उसाच्या वजनात संशय आल्यास त्यांना 9405156054 या व्हॉटसअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्याकडे तफावत सिद्ध करणाऱ्या वजनांच्या अधिकृत पावत्या असाव्यात. याशिवाय, कारखाना, वाहन नंबर आणि शेतकऱ्याच्या नावाचाही तक्रारीत उल्लेख असावा, अशा तक्रारी आल्यास त्यावर गांभीर्याने कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वैधमापन विभागाचे उपनियंत्रक अधिकारी आर. डी. दराडे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

कारखाना : पहिली उचल

  • भाऊसाहेब थोरात (बाळासाहेब थोरात) : 3200

  • शंकरराव काळे (आशुतोष काळे) : 3200

  • जय श्रीराम (रोहित पवार) : 3200

  • बबनराव ढाकणे (प्रताप ढाकणे) : 3100

  • अशोक (भानुदास मुरकुटे) : 3100

  • मारुतराव घुले (चंद्रशेखर घुले) : 3100

  • मुळा (शंकरराव गडाख) : 3100

  • वृद्धेश्वर (मोनिका राजळे) : 3100

यंदाच्या गाळपात पहिली उचल ही चार हजार मिळावी, यासाठी येत्या 23 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालणार आहोत. यामध्ये जर तोडगा निघाला नाही तर आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. असे झाले तर त्याची जबाबदारी ही शासन अन् प्रशासनाची असेल.
रवींद्र मोरे, शेतकरी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT